
नितेश गट्टीवार,गडचिरोली:दि.१९ मार्च
माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांचा विकास साधण्यासाठी आणि माओवादी हिंसक कारवायांना आळा बसविण्यासाठी गडचिरोली पोलीस यांच्या वतीने दिनांक १९ मार्च २०२६ रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत बंगाडी येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली.
उपपोस्टे लाहेरीपासून सुमारे ०८ कि.मी. तसेच छत्तीसगड राज्याच्या सीमारेषेपासून केवळ ०२ कि.मी. अंतरावर असलेल्या या अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या सुरक्षेला बळकटी देणे व त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीस मदत केंद्र, बंगाडी हे स्थानिक नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देत विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे.
सुमारे १००० सी–६० कमांडो, १८ बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, ५०० विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या संयुक्त प्रयत्नातून अवघ्या २४ तासांत नवीन पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले.
विशेष पोलीस महानिरीक्षक (नविअ), नागपूर संदीप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) CRPF अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, CRPF १९२ बटा. चे कमांडंट परविंदर सिंग, इतर वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत नवीन पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन पार पडले.
सन २०२३ पासून सुरक्षा पोकळी कमी करण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांच्या साखळीतील हे ११ वे नवीन पोलीस मदत केंद्र असून, दुर्गम भागात प्रभावी सुरक्षा जाळे उभारण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

