प्रतिनिधी/रुपेश सलामे
मुंबई – भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची नुकतीच भाजपा आदिवासी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे त्यांचा सत्कार सोहळा पार पडला.
या वेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ. होळी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
डॉ. होळी हे पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिले असून त्यांनी संघटनात्मक पातळीवर सातत्याने काम केले आहे. विशेषतः आदिवासी समाजातील त्यांची मजबूत पकड, तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क आणि गडचिरोली परिसरातील विकासकामांमधील सक्रिय सहभाग लक्षात घेऊन त्यांची आदिवासी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. देवराव होळी यांनी पक्ष नेतृत्वाने दिलेल्या जबाबदारीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
