आमदार रामदास मसराम यांचा राज्य सरकारला सवाल
आरमोरी – गडचिरोली जिल्ह्यासहित राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मागील २-३ महिने उलटूनही धान विक्रीचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात अध्यापही जमा न झाल्याने संतप्त होत आमदार रामदास मसराम यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. वारंवार पत्रव्यवहार करून, पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत, “शेतकरी आत्महत्या करण्याची वाट पाहत आहात का?” असा थेट सवाल त्यांनी केला.
जिल्ह्यातील अनेक धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी धान विक्री करून दोन ते तीन महिने लोटले आहेत. मात्र अद्यापही चुकारे जमा झाले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बियाणे, खत, कर्जफेड आणि घरखर्चासाठी पैसे नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
आमदार मसराम यांनी अधिवेशनादरम्यान हा प्रश्न जोरकसपणे मांडणार असल्याचे सांगितले. “तत्काळ धानाचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावेत. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
यासोबतच जिल्ह्यासाठी धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणीही त्यांनी केली. सध्याचे उद्दिष्ट अपुरे असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी अडचणी येत असल्याचे त्यांनी नमूद केले. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार मसराम यांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून लवकरच निधी उपलब्ध होऊन चुकारे जमा होतील, असे आश्वासन देण्यात येत असले तरी प्रत्यक्षात अद्यापही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप वाढत असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
