प्रतिनिधी/रुपेश सलामे
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची भारतीय जनता पक्षच्या महाराष्ट्र प्रदेश आदिवासी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या केंद्रीय व राज्य नेतृत्वाने त्यांच्या प्रभावी संघटनशक्तीची, आदिवासी समाजातील भक्कम पकडीची आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.
माजी आमदार डॉ. देवराव होळी हे यापूर्वी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. या पदावर असताना त्यांनी राज्यभर संघटन बळकटीसाठी व्यापक संपर्क मोहिमा राबवल्या, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवला आणि आदिवासी भागात पक्षाची मजबूत पायाभरणी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी संघटनात्मक रचना अधिक सक्षम करण्यात आली.
ते सध्या राष्ट्रीय SC/ST विकास परिषदचे राष्ट्रीय महामंत्री म्हणूनही कार्यरत आहेत. तसेच आदिवासी समाजातील शिखर संघटना असलेल्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी ते यशस्वीपणे सांभाळत आहेत. तसेच त्यांनी आपल्या समाज कार्याची सुरवात विध्यार्थी दशेपासूनच केली होती. शिक्षण घेत असतांना त्यांनी आदिवासी विध्यार्थी संघ व नंतर डॉ. झाल्यावर डॉक्टरांची संघटना असलेल्या मॅग्मा चे ते अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. त्यांनी आपल्या सामाजिक जीवनात आदिवासी समाजाच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि हक्कांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला आहे. त्यांच्या ह्या कार्याची दखल घेत पक्षाने त्याना 2 वेळेस विधानसभाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. व त्यांनी आपल्या 10 वर्षाच्या विधायकीच्या कार्यकाळात लोकहिताचे कार्य करून सर्व सामान्य नागरिकांच्या मनात आपला हक्काचा माणूस म्हणून ओळख निर्माण केली.
यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले. पक्षाने दिलेल्या या संधीचे सोनं करून महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नियुक्तीमुळे राज्यातील आदिवासी आघाडी अधिक सक्षम होऊन तळागाळातील प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
