प्रतिनिधी/रुपेश सलामे
गडचिरोली – गडचिरोली शहरातील समतानगर, ग्रीन सिटी वॉर्ड क्र. २३ येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास राष्ट्र सेवादलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते उमेश उईके, सामाजिक कार्यकर्ते मंगेश कामडी, तसेच आदिवासी विकास परिषद गडचिरोली चे शहर सहसचिव प्रफुल्ल कोडाप उपस्थित होते.
यावेळी उमेश उईके यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना त्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेच्या अद्वितीय कार्याचा उल्लेख करत सांगितले की, स्वराज्य हे केवळ सत्ता मिळवण्यासाठी नव्हते, तर जनतेच्या न्याय, सुरक्षितता आणि स्वाभिमानासाठी होते. महाराजांनी स्वराज्य निर्माण केलेच, पण ते सुयोग्यपणे कसे चालवायचे याचे आदर्शही घालून दिले.
यावेळी त्यांनी आजच्या राजकारणावर जोरदार हल्ला चढविताना स्पष्ट शब्दांत म्हटले की, “आजचे अनेक राजकारणी महापुरुषांचे नाव केवळ मतांसाठी वापरतात. त्यांच्या विचारांचा अवलंब करण्याऐवजी फक्त जयंती-पुण्यतिथीच्या कार्यक्रमांतून दिखावा केला जातो. जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून सत्तेचा खेळ खेळला जात आहे. शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱ्यांनी आधी त्यांच्या ध्येयधोरणांचा अभ्यास करावा आणि जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करावे.” असे मोलाचे मार्गदर्शन केले. यानंतर प्रमुख अतिथी मंगेश कामडी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि, शिवाजी महाराजांनी स्वराज्य ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवून सामान्य माणसाला सत्तेच्या केंद्रस्थानी आणले.
त्यांनी धर्मनिरपेक्ष आणि लोकाभिमुख राज्यकारभाराचा आदर्श निर्माण केला.
स्त्रियांचा सन्मान, शिस्तबद्ध प्रशासन आणि किल्ल्यांची मजबूत व्यवस्था हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य होते.
अन्यायाविरुद्ध लढणे आणि स्वाभिमान जपणे हा त्यांचा खरा संदेश होता. आजच्या पिढीने शिवरायांचे विचार आचरणात आणून समाजहितासाठी काम करणे हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल. असे मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शकांच्या आक्रमक आणि परखड भाषणामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शेवटी शिवरायांच्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
