:- धनोजे कुणबी समाजाचे प्रेरणास्थान, कर्तृत्ववान शेतकरी ते दूरदृष्टीचे उद्योजक असा प्रेरणादायी प्रवास घडविणारे कैलासवासी गजानन दिवांजी पावडे यांची ०२ फेब्रुवारी रोजी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने केवळ कुटुंबियांचाच नव्हे, तर उमरी (येडे) परिसरासह संपूर्ण विदर्भातील समाजजीवनात एक पोकळी निर्माण झाली आहे.
१९५२ साली ग्रामीण वातावरणात, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जन्मलेल्या गजाननरावांनी संघर्षालाच आपली ताकद बनवले. आई-वडील विठ्ठलभक्त असल्याने घरातच भक्ती, संस्कार आणि प्रामाणिकपणाचे बाळकडू मिळाले. हीच आध्यात्मिक परंपरा त्यांनी आयुष्यभर जपली.
आधुनिक शेतीचे धाडसी प्रयोग
शेती हा त्यांचा मूळ व्यवसाय. मात्र पारंपरिक पद्धतीत न अडकता त्यांनी शेतीत आधुनिकतेची जोड दिली. नव्या तंत्रांचा अवलंब, प्रयोगशील वृत्ती आणि अथक परिश्रम यांच्या बळावर त्यांनी शेतीला नवा आयाम दिला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना “उत्कृष्ट शेतकरी” म्हणून सन्मानित केले—हा त्यांच्या कर्तृत्वाचा अधिकृत ठसा होता.
उद्योजकतेची दूरदृष्टी
शेतीसोबतच त्यांनी जोडधंद्यांची वाट धरली. हॉटेल व्यवसाय, छोटेखानी व्हिडिओ थिएटर अशा उपक्रमांतून त्यांनी ग्रामीण भागात नव्या संधी निर्माण केल्या. पुढे बियाणे निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल टाकत त्यांनी “यशोदा सिड्स” या कंपनीची स्थापना केली. मेहनत, सचोटी आणि गुणवत्तेच्या बळावर कंपनीला नावारूपास आणले. विश्वासू सहकाऱ्यांचा मजबूत समूह उभा करत त्यांनी व्यवसायाची पायाभरणी भक्कम केली. भाऊ उच्चशिक्षित झाल्यानंतर आणि मुलगा सक्षम झाल्यावर कंपनीची जबाबदारी त्यांच्या हाती सोपवून त्यांनी स्वतःला अध्यात्ममार्गाकडे वळवले. ही त्यांची त्यागमय वृत्ती दर्शवणारी बाब होती.
गावविकासासाठी झटणारा सरपंच
उमरी (येडे) या छोट्याशा गावाला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी त्यांनी सरपंचपद स्वीकारले. सलग पाच वेळा सरपंच म्हणून निवड होणे, हीच त्यांच्या कार्याची जनमान्यता होती. गावातील रस्ते, बससुविधा, मूलभूत सोयीसुविधा यांसाठी त्यांनी स्वतःच्या खर्चानेही कामे केली.
अध्यात्मिक उन्नतीसाठी त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मूर्तीची स्थापना केली आणि दरवर्षी पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन केले. गावोगावातून भाविक जमत, महाप्रसादाचा लाभ घेत आणि गाव एकात्मतेने नटून जात असे.
अध्यात्म, दानशूरता आणि साधी राहणी
शहालंगडीचे वासुदेव महाराज आणि चपराळ प्रशांतधामचे कार्तिक स्वामी महाराज यांच्या प्रेरणेने त्यांनी अध्यात्ममार्ग स्वीकारला. गोशाळांना दान, मंदिरांना गुप्तदान—परंतु त्याची कधीही जाहिरात नाही. ‘साधी राहणी, उच्च विचार’ हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते. ग्रामगीता, रामायण, नामस्मरण यांत ते अखेरच्या क्षणापर्यंत रमले. सत्यनिष्ठा, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी जीवनात उंची गाठली; पण पाय मात्र मातीतच घट्ट रोवले.
विदर्भाचा सच्चा तुकडोजी भक्त
हिंगणघाट पंचक्रोशीपासून संपूर्ण विदर्भात त्यांचा नावलौकिक होता. लोक त्यांच्याकडे सच्चा तुकडोजी भक्त, परोपकारी आणि मार्गदर्शक म्हणून पाहत. अनेकांच्या आयुष्यात त्यांनी प्रेरणेचा दिवा पेटवला.
आज तो दिवा प्रत्यक्षात मालवला असला, तरी त्यांनी दिलेली प्रेरणा, संस्कार आणि समाजासाठीचे योगदान कायम स्मरणात राहील.
कैलासवासी गजानन दिवांजी पावडे यांना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली!
सुधीर खापने
मु.पो.चिकणी, ता वरोरा., जि चंद्रपूर
