
श्री . नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची दि. 23/11/25
बिहार मधील बोधगया स्थीत जगप्रसिद्ध महाबोधी बुद्ध विहाराच्या पूर्ण मुक्ततेसाठी देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील बौद्ध समाजाने ठाम पाठिंबा दिला. याच पार्श्वभूमीवर कोरची तालुक्यातील बौद्ध बांधवांनी भंते विनायाचार्य यांचेकडे आर्थिक मदतीचे धनादेश सुपुर्द केला.
भंते विनायाचार्य हे छत्तीसगढ राज्यातील राजनांदगांव जिल्ह्यातील ठाणा डोंगरगाव नजिकच्या बेंदरकट्टा गावात संदेश यात्रेच्या निमित्ताने आले होते. newsjagar
महाबोधी बुद्ध मंदिराचा संपूर्ण ताबा बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी जोर धरत असताना , देशभरातील बौद्ध संघटना व नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाला आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील बौद्ध समाजाने आपली साथ जोडली आहे.
कोरची तालुक्यातील विविध गावातील बौद्ध नागरिकांनी स्वेच्छेने जमा केलेली रक्कम भंते विनायाचार्य यांचेकडे सुपुर्द करण्यात आले. भंते विनायाचार्य हे महाबोधी बुद्ध विहाराच्या मुक्ततेसाठी लढा देणारे अग्रणी भंते आहेत. धनादेश स्वीकारल्यानंतर भंते विनायाचार्य यांनी कोरची तालुक्यातील बौद्ध समाजाचे आभार मानले. आणि म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या धम्मदिक्षेची ही खरी फलश्रुती आहे. दुर्गम डोंगरदऱ्या मध्ये राहणारे आपले बांधव महाबोधी बुद्ध विहाराच्या मुक्ततेसाठी समोर येत आहेत, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.
महाबोधी बुद्ध विहार हे केवळ बौद्धांचे परमपूज्य स्थळ नसून, जगातील बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान आहे. त्याच्या व्यवस्थापनेत बौद्धांचा पूर्ण अधिकार मिळावा हीच या आंदोलनाची मुख्य मागणी आहे. कोरची सारख्या आदिवासी भागातून मिळालेला हा पाठिंबा आंदोलनाला आणखी बळ देणारा आहे.


