अमरावती – मागील काही दिवसात अमरावती ग्रामीण व लगतच्या काही जिल्ह्यात नागरिकांना रस्त्याने जात असतांना अडवून स्वतः पोलिस असल्याचे सांगत तसेच रस्त्याने पुढे दरोडा, खून यासारखा गंभीर गुन्हा घडला असल्याची खोटी बतावणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांचे अंगावर असलेले मौल्यवान दागिने काढून ते नजरबंदीने लंपास करणार्या कुख्यात ईराणी टोळीला अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेने गजाआड केले आहे.
अमरावती ग्रामीणमधील तळेगांव दशासर, वरूड, मोर्शी, तिवसा, परतवाडा येथे अशाच पद्धतीचे गुन्हे घडले आहेत. तळेगाव दशासर हद्दीत ५ सप्टेंबरला यवतमाळचे अरूण लक्ष्मण गोरे पत्नीसह दुचाकीने बाभूळगांव ते देवगांव रोडने जात असतांना बुलेटवर आलेल्या २ अज्ञात इसमांनी त्यांना थांबवून स्वतः पोलिस असल्याचे सांगितले. तसेच रस्त्याने पुढे खून झाला असून सुरक्षिततेच्या दृष्टीने अंगावर असलेली सोन्याची पोत, गोफ, मंगळसूत्र व हातातील अंगठी असे एकूण ७४ ग्रॅमचे सोन्याचे दागिने काढून सोबत असलेल्या पिशवी ठेवण्याबाबत सांगितले. हे दागिने पिशवीत ठेवत असतांना हातचालाखी करून दागिने लंपास करून पळून गेले. त्याच दिवशी सदर घटनेनंतर काही तासांचे अंतरात अशा प्रकारची घटना वरूड पोलिस ठाणे हद्दीत सुद्धा घडली. त्याबाबत सुद्धा नोंद करण्यात आलेली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असताना वरील दोन्ही घटनेत आरोपींनी वापरलेले वाहन, सी.सी.टी.व्ही. फुटेज व तक्रारकर्त्यांनी सांगितलेले त्यांचे वर्णन यावरून आरोपी एकच असल्याचे निष्पन्न झाले होते. तांत्रिक माहितीच्या आधारे याबाबत शोध घेतला असता बीड जिल्ह्यातील परळी येथील सराईत गुन्हेगार इराणी जहीर अब्बास ऊर्फ मोटा हा त्याच्या साथीदारांसह मिळून अशा प्रकारचे गुन्हे करीत असल्याचे व त्यानेच अमरावती जिल्ह्यातील हे दोन्ही गुन्हे केले असल्याची माहिती प्राप्त झाली होती.
१९ सप्टेंबरला हे आरोपी नागपूरवरून परळीला जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगांव चौकीवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली असता पुलगांववरून येणार्या वाहनात इराणी जहीर अब्बास ऊर्फ मोटा अब्बास शेकु अली, वय ४० वर्षे, रा. शिवाजी नगर, परळ बैजनाथ, जि. बीड, लाला ऊर्फ गांची समीर शेख वय ४८ वर्ष रा. इंदिरा नगर, आंबेवली जि.ठाणे, वसीम शब्बीर ईराणी वय २५ वर्ष रा. बिरर, कर्नाटक व नझीर हुसेन अजीज अली, वय ५२ वर्ष रा.बिरर, कर्नाटक हे आरोपी सापडले. त्यांच्याकडून माल हस्तगत करण्यात आला. त्यांनी जिल्ह्यातील पाच पोलिस ठाणे हद्दीत अशा प्रकारे गुन्हे केल्याची कबुलीही दिली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वातील उपनिरीक्षक सागर हटवार, मूलचंद भांबुरकर, अंमलदार बळवंत दाभणे, गजेन्द्र ठाकरे, रवीन्द्र बावणे, मंगेश लकडे, सचिन मसांगे, दिनेश कनोजिया, पंकज फाटे, सचिन मिश्रा, सागर धापड, शिवा शिरसाट, प्रशिक वानखडे, मनोज ढवळे यांच्या पथकाने केली आहे.
