
वर्धा – राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी संघटना एकीकरण समितीच्या वतीने सुरू केलेल्या संपाच्या सोळाव्या दिवशी आज बुधवार ३ रोजी थाळीनाद तर अंगणवाडी कर्मचार्यांनी भरपावसात जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले.
यावेळी आरोग्य कर्मचार्यांनी थाळी वाजवून तर अंगणवाडी कर्मचार्यांनी घोषणाबाजी करीत जोरदार निदर्शने केली.
१४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा, उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करा, १० वर्ष व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचार्यांचे समकक्ष पदावर तात्काळ समायोजन करा, या मागणीसाठी कंत्राटी अधिकारी व कर्मचार्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. आज आंदोलनाच्या १६ व्या दिवशी थाळीनाद आंदोलन केले. National Health Mission या आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर विपरित परिणाम झाला आहे. लहान सर्जरी, लसिकरण शिबिर, अतितात्काळ सेवा, ग्रामीण भागातील उपकेंद्रांतर्गत मिळणार्या सर्व सेवा बंद झाल्या आहेत. १६ दिवस लोटून फत वरिष्ठ अधिकार्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मौखिक समाधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोपर्यंत कालमर्यादा कार्यक्रम आखून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आरोग्य कर्मचार्यांनी घेतली आहे.

तर ऑनलाइन कामे देण्यापेक्षा अंगणवाडीतील मुलांना शिकवू द्या, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचार्यांनी राज्य अध्यक्ष दिलीप उटाणे, जिल्हाध्यक्ष विजया पावडे, वंदना कोळणकर, मैना उईके, ज्ञानेश्वरी डंबारे, अल्का भानसे, माला भगत यांच्या नेतृत्वात दयालनगर येथून मोर्चा काढला. National Health Mission अंगणवाडीच्या मूलभूत कामा व्यतिरित शासन व प्रशासन योजना बाह्य काम करण्यासाठी जबरदस्ती थांबवावी, सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचार्यांना ग्रॅज्युटीचा लाभ द्यावा, दरमहा पेन्शन, आजारपणाच्या रजा, सेविकांना २ हजार रुपये व मदतनीसांना १ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, यासह अन्य मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. आंदोलनस्थळी जिपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) मनिषा कुरसंगे यांनी भेट देत निवेदन स्विकारले. स्थानिक मागण्यांवर चर्चा करून राज्यस्तरीय मागण्या तात्काळ शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. मागण्या मान्य न झाल्यास ९ सप्टेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा दिलीप उटाणे यांनी निवेदनातून दिला आहे.

