
‘डिजिटल डेमोक्रसी डायलॉग’ अंतर्गत राज्यभरातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सशी मुख्यमंत्र्यांचा संवाद; उद्योग, रोजगार, पायाभूत सुविधा आणि आदिवासी सक्षमीकरणावर भर!

नितेश गट्टीवार | जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली | दि. १५ नोव्हेंबर :

नक्षलवादाच्या छायेतून बाहेर पडत गडचिरोली जिल्हा आता विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करीत आहे. उद्योग, रोजगार, पायाभूत सुविधा आणि आदिवासी सक्षमीकरणाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हा देशातील विकासाचे नवे केंद्र म्हणून उदयास येत आहे. या जिल्ह्यात घडत असलेल्या परिवर्तनाची यशोगाथा डिजिटल माध्यमांच्या माध्यमातून देशभर पोहोचवावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पोलिस मुख्यालय, गडचिरोली येथे राज्यातील विविध भागांतून आलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सशी ‘डिजिटल डेमोक्रसी डायलॉग’ या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामांचा आणि होत असलेल्या परिवर्तनाचा आढावा घेत भविष्यातील विकासाची दिशा स्पष्ट केली.
गडचिरोली जिल्ह्याची ओळख पूर्वी नक्षलवादग्रस्त जिल्हा अशी होती. मात्र, आता ही ओळख बदलत असून जिल्ह्यात विकासाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. औद्योगिक विकासाला चालना, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी, आधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी तसेच आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध स्तरांवर प्रयत्नशील आहे. या सकारात्मक बदलांची माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केले.
सोशल मीडिया हे आज जनसंवादाचे प्रभावी माध्यम बनले असून, त्याच्या माध्यमातून गडचिरोलीतील विकासकामे, स्थानिक संस्कृती, पर्यटन, रोजगाराच्या संधी आणि आदिवासी बांधवांच्या प्रगतीची माहिती देशभरातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी गडचिरोलीच्या बदलत्या वास्तवाचे सकारात्मक चित्रण करून जिल्ह्याच्या विकासप्रवासाला व्यापक प्रसिद्धी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार कीर्तिकुमार भांगडिया, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्यासह संबंधित अधिकारी आणि राज्याच्या विविध भागांतून आलेले सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स उपस्थित होते.
गडचिरोलीच्या विकासाची नवी ओळख निर्माण होत असताना, या परिवर्तनाचा आवाज आता डिजिटल माध्यमांतून देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणार आहे.

