
पाच कोटींच्या मंजुरीपैकी दोन कोटीच प्राप्त; उर्वरित तीन कोटींची प्रतीक्षा, अर्धवट इमारतीमुळे प्रशासकीय कामकाजाचा प्रश्न ऐरणीवर

नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
चामोर्शी,दि.१७ नोव्हेंबर:चामोर्शी शहरातील नगर पंचायत प्रशासकीय भवनाचे स्वप्न निधीअभावी अधांतरी राहिले आहे. नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायतला स्वतःची सुसज्ज प्रशासकीय इमारत मिळावी, यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. अखेर महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून विशेष सहाय्य योजनेअंतर्गत प्रशासकीय भवनाच्या बांधकामासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, मंजूर निधीपैकी केवळ दोन कोटी रुपयेच प्राप्त झाल्याने बांधकामाला सुरुवात झाली. आता उर्वरित तीन कोटी रुपये शासनाकडून उपलब्ध झाले नसल्याने इमारतीचे काम अर्धवट अवस्थेत रखडले आहे. त्यामुळे चामोर्शी नगर पंचायतच्या प्रशासकीय भवनाचे स्वप्न पूर्ण होणार तरी कधी, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायतींना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विशेष सहाय्य योजना सन २०२०-२०२१ अंतर्गत प्रशासकीय भवन बांधकामासाठी पुढाकार घेतला होता. या योजनेअंतर्गत २० ऑगस्ट २०२१ रोजी नगर पंचायत प्रशासकीय भवन बांधकामास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी १७ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रत्येकी पाच कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता प्रदान केली होती.
मात्र, जिल्ह्यातील इतर नगर पंचायतींकडून विहित मुदतीत प्रस्ताव सादर न झाल्याने त्यांचा मंजूर निधी परत गेला. दुसरीकडे, चामोर्शी नगर पंचायतने आवश्यक प्रस्ताव सादर केल्यामुळे या योजनेचा लाभ मिळविण्यात यश मिळाले. त्यानुसार चामोर्शी नगर पंचायतच्या प्रशासकीय भवनासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली.
शासनाकडून पहिल्या टप्प्यात दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय भवनाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. बांधकामाचे काम सुरू होऊन काही प्रमाणात प्रगतीही झाली. मात्र, उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आणखी तीन कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हा निधी अद्याप उपलब्ध न झाल्याने बांधकामाची गती मंदावली असून, इमारत अर्धवट अवस्थेत उभी आहे.
विशेष म्हणजे, प्रशासकीय भवनासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत नगर पंचायत प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अद्याप शासनाकडून अपेक्षित निधी प्राप्त झालेला नाही. परिणामी, मंजूर निधी असूनही केवळ निधीच्या दुसऱ्या टप्प्याअभावी महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडल्याचे चित्र दिसून येत आहे.
नगर पंचायतला स्वतःची प्रशस्त व सुसज्ज प्रशासकीय इमारत उपलब्ध झाल्यास नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी मिळण्यास मदत होणार आहे. तसेच नगर पंचायतच्या प्रशासकीय कामकाजालाही अधिक गती मिळणार आहे. मात्र, निधीअभावी हा प्रकल्प अपूर्ण राहिल्याने नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले जात आहे.
शासनाने उर्वरित तीन कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देऊन प्रशासकीय भवनाचे बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी चामोर्शी शहरातील नागरिकांकडून होत आहे. केवळ मंजुरी देऊन न थांबता प्रत्यक्ष निधी उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनीही ठोस भूमिका घेऊन शासनदरबारी पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्रतिक्रिया :”नगर पंचायत प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. मात्र, सध्या उर्वरित निधीअभावी बांधकाम रखडले आहे. इमारतीचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.”
स्वप्नील पिदुरकर
नगर अभियंता, नगर पंचायत चामोर्शी

