
निधीअभावी अनेक घरांचे बांधकाम रखडले; प्रलंबित रक्कम तातडीने वितरित करण्याची शिवसेना (शिंदे गट)चे सुरज नैताम यांची मागणी

नितेश गट्टीवार||जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (चामोर्शी),दि.१७ नोव्हेंबर : शासनाकडून घरकुल मंजूर झाले, पहिला हप्ता मिळाला; मात्र दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा संपता संपेना! चामोर्शी तालुक्यातील अनेक घरकुल लाभार्थी सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत असून, प्रलंबित निधीअभावी अनेकांच्या घरांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत रखडले आहे. त्यामुळे घरकुलाचा दुसरा हप्ता नेमका कधी मिळणार? असा संतप्त सवाल लाभार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

चामोर्शी तालुक्यात शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत अनेक पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पहिला व दुसरा हप्ता जमा करण्यात आला. मात्र, दुसरीकडे अनेक पात्र लाभार्थी अद्याप दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. निधी मिळेल या आशेवर लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम सुरू केले; परंतु वेळेत अनुदान उपलब्ध होत नसल्याने बांधकाम पुढे नेणे कठीण झाले आहे.
घरकुल मंजूर, पण निधी रखडला; लाभार्थी आर्थिक संकटात!
सर्वसामान्य कुटुंबांसाठी स्वतःच्या हक्काचे पक्के घर हे आयुष्यातील मोठे स्वप्न असते. शासनाच्या घरकुल योजनेमुळे हे स्वप्न पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली. मात्र, हप्ते वेळेत मिळत नसल्याने लाभार्थ्यांची स्वप्ने अपूर्ण राहण्याची वेळ आली आहे. बांधकामासाठी घेतलेली उधारी, वाढता खर्च आणि मजुरांची देणी यामुळे लाभार्थ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.
शासनाने घरकुल मंजूर करून लाभार्थ्यांना दिलासा दिला असला, तरी प्रत्यक्ष बांधकाम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी वेळेत मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्रलंबित हप्त्यांचे तातडीने वितरण करा!
चामोर्शी तालुक्यातील दुसऱ्या हप्त्यापासून वंचित असलेल्या पात्र घरकुल लाभार्थ्यांची माहिती तातडीने तपासण्यात यावी. तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणांमुळे निधी रखडला असल्यास ती अडचण दूर करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रलंबित रक्कम त्वरित जमा करावी, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) चामोर्शी तालुका प्रसिद्धी प्रमुख सुरज देवराव नैताम यांनी केली आहे.
घरकुल योजना ही गरिबांच्या निवाऱ्याचे स्वप्न पूर्ण करणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. मात्र, निधी वेळेत मिळत नसेल तर लाभार्थ्यांना योजनेचा अपेक्षित लाभ कसा मिळणार? प्रशासनाने केवळ घरकुल मंजुरीपुरते मर्यादित न राहता बांधकाम पूर्ण होईपर्यंत लाभार्थ्यांना वेळेत आर्थिक मदत मिळेल, याची दक्षता घ्यावी. अन्यथा घरकुल लाभार्थ्यांची प्रतीक्षा आणखी लांबण्याची शक्यता आहे.
आता प्रशासनाने तातडीने दखल घेऊन चामोर्शी तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांचा दुसऱ्या हप्त्याचा प्रश्न मार्गी लावावा आणि सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांचा हक्काचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी सुरज नैताम यांनी केली आहे.

