
आमदार रामदास मसराम यांचा पाठपुरावा संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश.

नितेश गट्टीवार| जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
मुंबई,दि.१७ नोव्हेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या आणि बंद असलेली टीडीसी व फेडरेशनची आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू करण्याच्या मागणीसाठी आमदार रामदास मसराम यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली.

यावेळी आमदार मसराम यांनी प्रलंबित धान खरेदी व शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी मंत्रिमहोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बंद असलेली धान खरेदी केंद्रे सुरू करण्याचे निर्देश दिले.
तसेच प्रलंबित असलेली सर्व धान खरेदी करण्यात येईल, बहिष्काराबाबत तातडीने तोडगा काढून खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात येईल आणि कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होऊ दिले जाणार नाही, असे आश्वासन मंत्रिमहोदयांनी आमदार रामदास मसराम यांना दिले.

