
नितेश गट्टीवार | जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली | दि. १५ नोव्हेंबर
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी गडचिरोलीच्या नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर व नगरसेवक सागर निंबोरकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेतला आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बळीराजाला आधार मिळावा, या उदात्त हेतूने त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २ लाख ५१ हजार रुपये (₹२,५१,०००) देणगीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

आज गडचिरोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. अशा कठीण प्रसंगी शेतकरी कुटुंबांना मदतीचा हात देणे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे, ही भावना मनात ठेवून निंबोरकर दाम्पत्याने हा मदतीचा पुढाकार घेतला.
संकटात सापडलेल्या बळीराजाला मदतीचा हात देणे हेच खरे सामाजिक दायित्व! शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याच्या कष्टावर समाजाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी संकटात असताना केवळ सहानुभूती व्यक्त न करता प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिलेली ही २ लाख ५१ हजार रुपयांची मदत सामाजिक संवेदनशीलता आणि शेतकऱ्यांप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करणारी ठरली आहे. त्यांच्या या पुढाकाराची परिसरात चर्चा होत असून संकटाच्या काळात बळीराजाच्या पाठीशी उभे राहण्याचा सकारात्मक संदेश या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचला आहे.

