
प्रतिनिधी |चामोर्शी: तालुक्यातील जामगिरी येथील जीजा हंसराज सातर (२७) या महिलेचा व तिच्या नवजात बाळाचा मृत्यू आरोग्य व्यवस्थेतील समन्वयाचा अभाव, उपचारातील विलंब व संभाव्य निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी NSUI जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे यांनी केली आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी तथा नायब तहसीलदार तारेश फुलझले यांच्याकडे निवेदन साद करण्यात आले.
जामगिरी येथील जीजा हंसराज सातर यांना रविवारी पहाटे ५ वाजता प्रसूतीसाठी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी नर्सेसनी त्यांची तपासणी केली. मात्र, रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. रेफर लेटरसाठी नर्सेसनी डॉक्टरांना बोलाविल्यानंतर कर्तव्यावर असलेले डॉक्टर रुग्णालयात आले.
तालुकास्तरावर आवश्यक उपचार व शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असतानाही संबंधित महिलेला गडचिरोली येथे रेफर करण्यात आले. सकाळी ११.४५ वाजता महिला गडचिरोली येथे पोहोचली. दरम्यान, रेफर करण्याच्या प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे महिलेच्या प्रकृतीवर परिणाम झाला का, याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे राहुल वैरागडे यांनी सांगितले.

गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात पोहोचल्यानंतर महिलेच्या पोटातील बाळ दगावल्याचे समोर आले. त्यावेळी महिला सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अशा गंभीर परिस्थितीत रुग्ण व कुटुंबीयांना योग्य समुपदेशन व मानसिक आधार देणे आवश्यक असताना त्यांच्याशी कथितरीत्या उद्धट वर्तन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर महिलेची प्रकृती ढासळल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, तेथेही उपचार व्यवस्थेतील अव्यवस्था व समन्वयाच्या अभावाचा फटका बसल्याचा आरोप करत उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याचे राहुल वैरागडे यांनी म्हटले आहे.
या संपूर्ण घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, चामोर्शी ग्रामीण रुग्णालयातील संबंधित नर्सेसची चौकशी करावी तसेच निष्काळजीपणा सिद्ध झाल्यास दोषींवर बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मृत महिलेच्या कुटुंबीयांना शासनाकडून योग्य सानुग्रह मदत देण्यात यावी, अशीही मागणी राहुल वैरागडे यांनी केली.
यावेळी आशिष घेर, ओमप्रकाश चौधरी, संजय बुरांडे, गंगाधर बोमनवार आदी उपस्थित होते.

