
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली, दि. २६ ऑगस्ट : गडचिरोली शहरातील शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह क्र. १ व २ येथे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी बुधवारी सायंकाळी प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा, दैनंदिन अडचणी आणि वसतिगृहातील सुविधांचा आढावा घेत त्यांनी समस्या प्राधान्याने सोडविण्याची ग्वाही दिली.
आमदार नरोटे यांनी वसतिगृहातील वाचनालय, संगणक कक्ष, विविध शैक्षणिक सुविधा तसेच संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी वाचनालयात आवश्यक पुस्तकांची कमतरता असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. विद्यार्थ्यांच्या या मागणीची तत्काळ दखल घेत येत्या सात दिवसांत आवश्यक पुस्तके उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदारांनी दिले.

विशेषतः MPSC, UPSC, JEE, NEET आणि MHT-CET यांसारख्या स्पर्धा व प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन, अभ्यासासाठी पोषक वातावरण आणि आवश्यक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे डॉ. नरोटे यांनी स्पष्ट केले.
वसतिगृहातील इतर अडचणीही संबंधित विभाग व प्रशासनाशी समन्वय साधून प्राधान्याने मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेण्याच्या आमदारांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
“गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्पर्धा परीक्षांची प्रभावी तयारी करण्यासाठी योग्य वातावरण आणि आवश्यक शैक्षणिक सुविधा मिळणे ही आपली प्राथमिकता आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल,” असे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सुरजजी पोटावी, संकेतजी कुनघाडकर, वसतिगृह क्र. १ चे अधीक्षक विश्वजीतजी काळे, वसतिगृह क्र. २ चे अधीक्षक योगेशजी फुसे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

