
सामाजिक कार्यकर्ते तथा माळी समाजाचे तालुका अध्यक्ष बंटी उर्फ महेश मोहूर्ले ‘जिल्हा गौरव’ पुरस्काराने सन्मानित
एटापल्ली : नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण व शाश्वत विकास साधून सन २०४७ पर्यंत जिल्ह्याला प्रगतीच्या शिखरावर नेण्याच्या संकल्पनेतून ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ सादरीकरण व संबोधन कार्यक्रम तसेच गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनानिमित्त भव्य ‘जिल्हा गौरव पुरस्कार वितरण सोहळा’ दि. २६ ऑगस्ट रोजी अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात पार पडला.
भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने ‘व्हिजन गडचिरोली २०४७’ या दूरगामी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आगामी २५ वर्षांत जिल्ह्याचा चेहरामोहरा कसा असावा, नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत आणि जल, जमीन व जंगलासारख्या विपुल नैसर्गिक संसाधनांचा तसेच मानवी शक्तीचा योग्य वापर करून जिल्ह्याचा शाश्वत विकास कसा साधता येईल, यावर या विचारमंथन सोहळ्यात सविस्तर चर्चा झाली.

या कार्यशाळेत सर्वपक्षीय राजकीय नेते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, अभ्यासू नागरिक आणि वृत्तपत्र, टीव्ही व डिजिटल पोर्टल माध्यमांचे पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गडचिरोली जिल्ह्याच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘जिल्हा गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये एटापल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माळी समाजाचे तालुका अध्यक्ष बंटी उर्फ महेश मोहूर्ले यांना त्यांनी सामाजिक व विकास क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते ‘जिल्हा गौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
दुर्गम व सीमावर्ती एटापल्ली तालुक्यासाठी ही बाब अत्यंत अभिमानास्पद ठरली असून, पुरस्कार जाहीर होताच एटापल्ली परिसरातून बंटी उर्फ महेश मोहूर्ले यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

