
दोन बारा चाकी वाहनांत ८८ जनावरे आढळली; चालकांचा जंगलातून पलायन
एटापल्ली : नाईट पेट्रोलिंगदरम्यान एटापल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत जनावरांची संशयितरीत्या वाहतूक करणारी दोन बारा चाकी वाहने ताब्यात घेतली. या दोन्ही वाहनांमधून तब्बल ८८ जनावरे आढळून आली आहेत. पोलिसांची चाहूल लागताच वाहनचालकांनी वाहने काही अंतरावर थांबवून जंगलाच्या दिशेने पलायन केल्याची घटना बुधवार, २६ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ४.४५ वाजता गुरुपल्ली गावाजवळ घडली.
एटापल्ली पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई चंद्रशेखर, पोलीस शिपाई भूपेंद्र, पोलीस शिपाई श्याम मडावी आणि पोलीस शिपाई वट्टी यांचे पथक पहाटेच्या सुमारास नाईट गस्त व पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी गुरुपल्ली गावाजवळ दोन संशयित टाटा कंपनीच्या बारा चाकी वाहनांमधून मोठ्या प्रमाणात जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहिती मिळताच पोलिसांनी संशयित वाहनांकडे धाव घेत त्यांना हात दाखवून थांबण्याचा इशारा केला. मात्र, वाहनचालकांनी पोलिसांचा इशारा न जुमानता वाहने पुढे नेली. काही अंतरावर दोन्ही वाहने थांबवून चालकांनी वाहनातून उड्या मारल्या आणि जवळील जंगलातील अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र अंधाराचा फायदा घेत चालक जंगलात पसार झाले.
त्यानंतर पोलिसांनी दोन्ही वाहनांची कसून तपासणी केली. TS 08 UB 5769 क्रमांकाच्या वाहनामध्ये अंदाजे ४० जनावरे, तर AP 16 TE 1238 क्रमांकाच्या वाहनामध्ये अंदाजे ४८ जनावरे आढळून आली. दोन्ही वाहनांमध्ये मिळून एकूण ८८ जनावरे असल्याचे समोर आले.
घटनेची माहिती मिळताच एटापल्ली पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक नागरगोजे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही वाहने आणि त्यातील जनावरे ताब्यात घेतली.
पोलीस अधीक्षक गडचिरोली एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक पायघन व पोलीस पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, जनावरांची वाहतूक नेमकी कोणत्या उद्देशाने केली जात होती, जनावरे कुठून आणण्यात आली होती आणि त्यांना कुठे नेण्यात येत होते, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. पसार झालेल्या वाहनचालकांचा शोध घेण्यासाठीही पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पायघन करीत आहेत

