
गडचिरोली वर्धापन दिन विशेष : नक्षलोत्तर गडचिरोली — समृद्धीच्या नव्या क्षितिजांकडे
भयातून विश्वासाकडे
२६ ऑगस्ट १९८२ रोजी स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आलेला गडचिरोली आज परिवर्तनाच्या निर्णायक टप्प्यावर आहे. ‘नक्षलग्रस्त व अतिदुर्गम’ ही ओळख मागे पडत असून शांतता, सुरक्षितता आणि विकासाच्या बळावर जिल्हा नव्या दिशेने वाटचाल करत आहे.

सुरक्षा आणि लोकविश्वास
मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा व विकासाच्या प्रयत्नांमुळे नक्षलवादाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. ‘पोलीस दादालोरा खिडकी’सह विविध उपक्रमांतून प्रशासन दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. २०२४ मधील विक्रमी मतदान हे वाढत्या लोकविश्वासाचे प्रतीक ठरले.
कनेक्टिव्हिटीला वेग
रस्ते, पूल, रेल्वे आणि डिजिटल सुविधांच्या विस्तारामुळे गडचिरोलीची दुर्गमता कमी होत आहे. वडसा–गडचिरोली रेल्वे, भंडारा–गडचिरोली समृद्धी महामार्ग आणि विविध पुलांच्या प्रकल्पांमुळे जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला वेग मिळणार आहे.
उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधी
सुरजागडसह लोहखनिजाच्या साठ्यांमुळे गडचिरोली उदयोन्मुख पोलाद केंद्र म्हणून पुढे येत आहे. औद्योगिकीकरणासोबत स्थानिक युवकांसाठी कौशल्य, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी वाढत आहेत.
जल, आरोग्य आणि शिक्षण
जलसुरक्षा, घरगुती नळजोडणी, वैद्यकीय महाविद्यालय, आधुनिक आरोग्य सुविधा, डिजिटल शिक्षण आणि PM SHRI शाळांमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील मानवी विकासाला नवी दिशा मिळत आहे.
खनिजांपलीकडील गडचिरोली
वनसंपदा, जैवविविधता, आदिवासी संस्कृती आणि पर्यटनस्थळे ही गडचिरोलीची मोठी ताकद आहे. ‘जल, जंगल आणि जमीन’ यांचे संरक्षण करत स्थानिक समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे आवश्यक आहे.
विकसित गडचिरोलीकडे वाटचाल
भयातून विश्वासाकडे, संघर्षातून समृद्धीकडे गडचिरोलीची वाटचाल सुरू आहे. वर्धापन दिन हा या परिवर्तनाचा अभिमान बाळगण्यासोबतच शांततामय, सक्षम, आत्मनिर्भर आणि विकसित गडचिरोली घडविण्याचा संकल्प दृढ करण्याचा दिवस आहे.
हा नवा गडचिरोली — समृद्धीच्या नव्या क्षितिजांकडे झेपावणारा गडचिरोली!
– गजानन जाधव
जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली

