
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने ‘नवी दिशा – नवा गडचिरोली – विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेचे सादरीकरण व संबोधन तसेच जिल्हा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनाचे औचित्य साधून बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता इंदिरा गांधी चौक येथील राजीव गांधी सभागृह, गडचिरोली येथे हा विशेष कार्यक्रम पार पडणार आहे.

गडचिरोलीच्या विकासाला नवी गती देणे, जिल्ह्याच्या नैसर्गिक, औद्योगिक, शैक्षणिक व पर्यटन क्षेत्रातील क्षमता अधोरेखित करणे आणि आगामी काळातील विकासाचे दूरदृष्टीपूर्ण नियोजन यावर या कार्यक्रमात विचारमंथन होणार आहे. ‘व्हिजन २०४७’च्या माध्यमातून विकसित, सक्षम आणि समृद्ध गडचिरोलीची दिशा मांडली जाणार असल्याने या कार्यक्रमाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक डॉ. देवराव होळी, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चा तथा माजी आमदार, गडचिरोली विधानसभा मतदारसंघ यांनी जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विकासप्रेमी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

