
भेंडाळा/चामोर्शी प्रतिनिधी : चामोर्शी तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. चामोर्शी येथील दहेगाव अंगणवाडीत साप आढळल्याची घटना ताजी असतानाच, आज भेंडाळा येथील अंगणवाडी केंद्रात चक्क नाग साप आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे अंगणवाडीतील चिमुकल्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अंगणवाडी ही लहान बालकांच्या संगोपनाची आणि शिक्षणाची सुरक्षित जागा असणे अपेक्षित असताना, परिसरातील अस्वच्छता आणि दुर्लक्षामुळे सापांचेच ‘माहेरघर’ बनत असल्याची संतप्त भावना पालकांकडून व्यक्त होत आहे. अंगणवाडी परिसरात झाडाझुडपांची वाढ, कचरा व अस्वच्छता यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे
विशेष म्हणजे, चामोर्शीतील दहेगाव अंगणवाडीत साप आढळल्याची घटना ताजी असतानाच भेंडाळ्यात नाग आढळल्याने संबंधित विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

लहान चिमुकले दररोज अंगणवाडीत येत असल्याने त्यांच्या जीविताशी कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज आहे. अंगणवाडी परिसराची स्वच्छता, झाडाझुडपांची साफसफाई आणि नियमित देखभालीची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी, अशी जोरदार मागणी पालकांकडून होत आहे.
‘दुर्घटना घडण्याची वाट पाहू नका!’
अंगणवाडीत वारंवार साप आढळण्याच्या घटना घडत असतील तर ही बाब केवळ स्वच्छतेचा प्रश्न नसून चिमुकल्यांच्या जीवित सुरक्षेचा गंभीर विषय आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि अंगणवाड्या सापमुक्त व सुरक्षित करण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था उभारावी, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.

