
‘रोज साप येतोय, आता दुर्घटना घडण्याची वाट पाहणार का?’ पालकांचा संतप्त सवाल; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भीतीचे वातावरण
गडचिरोली/चामोर्शी,दि.२४ ॶॉगस्ट : चामोर्शी येथील दहेगाव अंगणवाडीत साप आढळण्याचा प्रकार आता एक-दोन वेळेपुरता मर्यादित राहिलेला नसून, रोज सकाळी मन्यार साप अंगणवाडी परिसरात येऊन ठाण मांडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे अंगणवाडीत येणाऱ्या चिमुकल्या बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पालकांमध्ये प्रचंड भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अंगणवाडी परिसरात वाढलेले गवत-झुडपे, अस्वच्छता आणि इमारतीची झालेली दुरवस्था यामुळे सापांचा वावर वाढल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. अंगणवाडी देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. दररोज सकाळी साप दिसत असेल तर आपल्या चिमुकल्यांना अंगणवाडीत पाठवायचे तरी कसे? असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

लहान मुलांना साप अथवा इतर विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका ओळखता येत नाही. त्यामुळे एखादा साप बालकांच्या संपर्कात आल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच प्रशासनाने जागे होणे गरजेचे आहे.
अंगणवाडी परिसरातील वाढलेले गवत व झुडपे तातडीने हटविणे, संपूर्ण परिसराची स्वच्छता करणे, अंगणवाडीतील भगदाडे बुजविणे, फुटलेल्या स्लाईलची दुरुस्ती करणे तसेच सापांचा इमारतीत प्रवेश होऊ नये यासाठी कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
नगरपंचायतीकडून सफाई व दुरुस्तीचे आश्वासन
याबाबत चामोर्शी नगरपंचायतीचे स्वप्निल बिदुरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “दहेगावची अंगणवाडी चामोर्शी नगरपंचायतीच्या अखत्यारित येत नसून बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारित आहे. मला याबाबत यापूर्वी माहिती नव्हती. आज फोनद्वारे माहिती मिळाली. तरी उद्या सफाई कर्मचारी पाठवून अंगणवाडी परिसरातील कचरा साफ करून देण्यात येईल. तसेच शाळेतील फुटलेल्या स्लाईलचीही दुरुस्ती करून देण्यात येईल.”
‘दुर्घटना होण्याची वाट पाहणार का?’
‘रोज साप येतोय, आता एखादी दुर्घटना घडण्याची वाट पाहणार का?’ असा संतप्त सवाल पालक व ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. महिला व बाल विकास विभाग तसेच संबंधित प्रशासनाने या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन अंगणवाडी केंद्राची पाहणी करावी आणि चिमुकल्यांच्या जीविताला धोका निर्माण करणारी परिस्थिती त्वरित दूर करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
चिमुकल्यांच्या सुरक्षेशी संबंधित हा प्रश्न केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित नसून, एखादी जीवघेणी घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

