
इंग्रजी भाषेतील प्रभावी सादरीकरणासह ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र–२०४७’ विषयावर उत्कृष्ट कामगिरी; शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/चामोर्शी,दि.२४ ॶॉगस्ट : जिल्हास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळावा–२०२६ अंतर्गत आयोजित भाषण स्पर्धेत चामोर्शी येथील निशिगंधा इंग्लिश स्कूलचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी कपिस मोरेश्वर कुनघाडकर याने आपल्या बुद्धिमत्तेची, अभ्यासाची आणि प्रभावी सादरीकरणाची छाप उमटवत प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे निशिगंधा इंग्लिश स्कूलच्या शैक्षणिक यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन सोमवार, २४ ऑगस्ट २०२६ रोजी कमलताई मुनघाटे हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोली येथे करण्यात आले होते. या मेळाव्यात जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधून तालुकास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेले एकूण २४ विद्यार्थी सहभागी झाले होते.
या वर्षीच्या स्पर्धेसाठी ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र–२०४७ : भवितव्य आणि आव्हाने’ हा विषय देण्यात आला होता. कपिस कुनघाडकर याने या विषयाचा सखोल अभ्यास करून पीपीटीच्या माध्यमातून प्रभावी सादरीकरण केले. तसेच विषयाशी संबंधित विविध मॉडेल्स तयार करून त्यांचे उत्कृष्ट विवेचन केले. विशेष म्हणजे, त्याने संपूर्ण सादरीकरण इंग्रजी भाषेत आत्मविश्वासाने करत उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. त्याच्या अभ्यासपूर्ण मांडणीला आणि प्रभावी सादरीकरणाला परीक्षकांनी विशेष पसंती देत त्याला प्रथम क्रमांक घोषित केले.
या यशाबद्दल शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कपिस कुनघाडकर याचा पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी त्याच्या सादरीकरणाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कपिसच्या या उल्लेखनीय यशाबद्दल राहुल लोक विकास मंडळाचे सचिव विवेक भाऊ सहारे, कोषाध्यक्ष वक्तुजी उंदीरवाडे, सदस्य माणिक साखरे, निशिगंधा इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका व संचालिका वालदे, तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले. विद्यार्थ्याच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस सर्वांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
‘जिद्द, अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जिल्हास्तरावर प्रथम!’ कपिस कुनघाडकरच्या या यशामुळे चामोर्शीच्या शैक्षणिक क्षेत्राचीही मान उंचावली आहे.

