
चामोर्शी (प्रतिनिधी):प्रसूतीसाठी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका २७ वर्षीय मातेचा आणि तिच्या नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत संतापजनक घटना २३ ऑगस्ट रोजी घडली आहे. वेळेवर योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे आणि प्रशासकीय हलगर्जीपणामुळे हा घातपात झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांकडून व स्थानिकांकडून करण्यात येत असून, या घटनेमुळे चामोर्शीतील आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काय घडली नेमकी घटना?
जामगिरी (ता. चामोर्शी) येथील रहिवासी असलेल्या जिजा हंसराज सातर यांना पहिल्या प्रसूतसाठी २३ ऑगस्ट रोजी पहाटे चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.प्रसूतीकळा सुरू असतानाही सकाळी साडेदहा वाजेपर्यंत रुग्णालयात एकही स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नव्हता, असा संतापजनक आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

विशेष म्हणजे, चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दोन स्त्रीरोगतज्ज्ञांची नियुक्ती असतानाही त्या वेळेस दोन्हीपैकी एकही डॉक्टर हजर नव्हता.उपस्थित परिचारिकांकडे विचारणा केली असता, “त्यांची प्रकृती ठीक आहे,” असे थातुरमातुर उत्तर देत टाळाटाळ करण्यात आली.
अवघ्या काही तासांत होत्याचे नव्हते झाले
साडेदहा वाजण्याच्या सुमारास जिजा सातर यांची प्रकृती चिंताजनक रित्या बिघडल्यानंतर त्यांना घाईघाईने महिला व बाल रुग्णालयात हलविण्यात आले.तिथे पावणेबारा वाजता त्यांची प्रसूती झाली, परंतु जन्मानंतर अवघ्या काही मिनिटांतच नवजात बालकाने प्राण सोडले.
बालकाच्या मृत्यूनंतर काही तासांतच मातेलाही तीव्र रक्तस्राव सुरू झाला आणि रक्तदाब वाढल्याने तिची प्रकृती अधिकच खालावली.
तिला जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच रात्री साडेनऊच्या सुमारास जिजा सातर यांनीही अखेरचा श्वास घेतला. पहिल्यांदा आई होण्याचे स्वप्न अधुरे राहिलेल्या जिजा आणि त्यांच्या बालकाच्या एकाच दिवशी झालेल्या मृत्यूने सातर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रतिक्रिया : संबंधित घटणेबाबत चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रविनकुमार किलनाके यांना विचारणा केली असता, संबंधित डॉक्टर व दोन नर्स ह्यांच्या निष्काळजीपणामुळे गडचिरोली येथे रेफर केल्याने आपण त्यांना शोकास नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

