
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली: भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे तथा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वाखाली भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांनी मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे OSD सुनील मित्रा यांची भेट घेतली. यावेळी मार्कंडादेव येथे सुरू असलेल्या महागंगा आरतीसह मंदिर परिसरातील प्रलंबित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मार्कंडादेव येथे श्रावण महिन्यात होणाऱ्या महागंगा आरतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहावे, अशी आग्रहाची विनंती सुरेश शहा यांनी OSD सुनीलजी मित्रा यांच्यामार्फत केली. श्रावणातील उर्वरित दोन सोमवारपैकी कोणत्याही एका सोमवारी मुख्यमंत्र्यांनी मार्कंडादेव येथे उपस्थित राहिल्यास भाविकांमध्ये मोठा उत्साह निर्माण होईल, तसेच मंदिराच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांसाठी गंगा आरतीचे निमंत्रणही देण्यात आले.

मार्कंडाच्या विकासकामांना गती देण्याची मागणी
मार्कंडादेव हे धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे स्थळ असून, येथे सुरू असलेली विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणीही सुरेश शहा यांनी केली. विशेषतः गंगा आरतीच्या ठिकाणी पायऱ्यांची दुरुस्ती, हायमास्ट लाईटची व्यवस्था, परिसराचे सुशोभीकरण तसेच भाविकांसाठी योग्य बसण्याची व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली.
उत्तरवाहिनी वैनगंगा नदीमुळे मार्कंडादेवला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, दर सोमवारी होणाऱ्या गंगा आरतीसाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. त्यामुळे भाविकांच्या सुविधा वाढविण्यासाठी आवश्यक कामांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.
यावर OSD सुनील मित्रा यांनी संबंधित विकासकामांबाबत लवकरच कार्यवाही करून आवश्यक बाबी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीबाबतही त्यांच्यापर्यंत निमंत्रण व विनंती पोहोचविण्याचे आश्वासन देण्यात आले.
भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांनी सकारात्मक प्रतिसादाबद्दल सुनीलजी मित्रा यांचे आभार मानले. या भेटीमुळे मार्कंडादेवच्या विकासकामांना तसेच भाविकांच्या सुविधांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

