
आलापल्ली येथे अत्याधुनिक केंद्राचे लोकार्पण; स्थानिक सागवानाच्या मूल्यवर्धनासह रोजगारनिर्मितीवर भर,
गडचिरोली ,२५ ऑगस्ट :जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत संधी उपलब्ध करून देण्यासाठी आलापल्ली येथील ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्र’ महत्त्वपूर्ण ठरेल. या केंद्रामुळे गडचिरोलीतील काष्ठ प्रक्रियेला नवी ओळख मिळण्यासोबतच महिलांच्या आर्थिक आत्मनिर्भरतेला बळ मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी व्यक्त केला.
जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजना २०२४-२५ अंतर्गत महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या (एफडीसीएम) शासकीय आरा गिरणी, आलापल्ली येथे सुमारे १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण जिल्हाधिकारी श्री. पंडा यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रात आधुनिक यंत्रसामग्री, काष्ठ प्रक्रिया व फर्निचर निर्मितीसाठी आवश्यक सुविधा तसेच प्रशिक्षणासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात आली आहे.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. पंडा म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्याला विपुल वनसंपदा आणि दर्जेदार सागवान लाभले आहे. या वनसंपदेवर स्थानिक पातळीवर प्रक्रिया आणि मूल्यवर्धन झाल्यास त्यातून रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळेल. आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य प्रशिक्षणाची सांगड घालून स्थानिक युवक व महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याची क्षमता या केंद्रात आहे.
महिलांसाठी कौशल्यातून रोजगाराची नवी वाट :-
महिलांना काष्ठकाम व फर्निचर निर्मितीचे व्यावसायिक प्रशिक्षण देणे हा या प्रकल्पाचा महत्त्वाचा उद्देश आहे. पारंपरिकदृष्ट्या पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या कारपेंटरी आणि काष्ठ प्रक्रिया क्षेत्रात महिलांनी प्रशिक्षण घेऊन आपले कौशल्य सिद्ध केले आहे. केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी प्रत्यक्ष टेबल, ट्रे आणि विविध प्रकारच्या काष्ठ वस्तू तयार करून प्रशिक्षणाचे कौशल्यात आणि कौशल्याचे रोजगारक्षमतेत रूपांतर होऊ शकते, हे दाखवून दिले आहे.
महिलांना केवळ प्रशिक्षण देण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता त्यांना नियमित रोजगार अथवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उत्पादननिर्मितीसाठी आवश्यक सहाय्य देणे आणि तयार उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.
गडचिरोलीच्या सागवानाचे स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन :-
गडचिरोलीचे सागवान देशपातळीवरील विविध ऐतिहासिक व महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये वापरले जात आहे. आता या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध सागवानावर स्थानिक पातळीवर आधुनिक पद्धतीने प्रक्रिया करून दर्जेदार फर्निचर व अन्य काष्ठ उत्पादने तयार करण्याला चालना मिळणार आहे. त्यामुळे कच्च्या स्वरूपातील वनउपजेला स्थानिक स्तरावर मूल्यवर्धनाची जोड मिळून गडचिरोलीच्या काष्ठ उत्पादनांची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यास मदत होणार आहे.
केंद्रातील आधुनिक यंत्रसामग्रीच्या माध्यमातून काष्ठ प्रक्रिया, फर्निचर निर्मिती, फिनिशिंग आणि दर्जेदार उत्पादननिर्मितीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे स्थानिक महिला व युवकांना आधुनिक काष्ठ उद्योगाच्या गरजांनुसार आवश्यक कौशल्य आत्मसात करता येणार आहे.
प्रशिक्षण ते बाजारपेठ अशी सक्षम साखळी :-
केंद्राच्या दीर्घकालीन शाश्वततेसाठी प्रशिक्षण–उत्पादन–बाजारपेठ–उत्पन्न अशी सक्षम साखळी निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. येथे तयार होणारे फर्निचर व अन्य काष्ठ उत्पादने आश्रमशाळा, शासकीय कार्यालये तसेच विविध संस्थांच्या गरजांशी जोडण्याबरोबरच नागपूर विभागातील बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यामुळे प्रशिक्षित महिलांना त्यांच्या कौशल्यातून नियमित उत्पन्न मिळण्यास मदत होईल आणि केंद्राला दीर्घकालीन स्थैर्य प्राप्त होईल.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक गणेश मोटकर यांनी प्रकल्पाची माहिती दिली. जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून उपलब्ध करून देण्यात आलेल्या १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून आधुनिक यंत्रसामग्री, शेड आणि प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शन व सहकार्याने अवघ्या काही महिन्यांत केंद्राची उभारणी पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षित महिला कारपेंटरचा गौरव :-
केंद्रातील प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून प्रत्यक्ष फर्निचर व विविध काष्ठ उत्पादने तयार करणाऱ्या महिला कारपेंटरचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. मुक्ताबाई भुपेलीवार, कविता मुळकरी, संध्या ठाकरे, राजलक्ष्मी पोपेली आणि लक्ष्मी पेदी यांचा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या महिलांनी प्रशिक्षणातून आत्मसात केलेले कौशल्य आणि त्यांनी तयार केलेली उत्पादने ही या उपक्रमाच्या प्रत्यक्ष फलश्रुतीचे उदाहरण ठरली आहेत.
लोकार्पणानंतर जिल्हाधिकारी व उपस्थित मान्यवरांनी केंद्रातील अत्याधुनिक यंत्रसामग्रीची पाहणी केली. महिलांनी तयार केलेले टेबल, ट्रे व विविध काष्ठ उत्पादनांची माहिती घेत त्यांच्या कामाचे आणि उत्पादनांच्या दर्जाचे कौतुक केले.
यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक दिव्याभारती, उपवनसंरक्षक शैलेश मीना, सहायक जिल्हाधिकारी अजय डोके, उपविभागीय अधिकारी प्रशांत पिसाळ, तहसीलदार बालाजी सोमवंशी, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी रमेश पेरगू, संशोधन अधिकारी श्री हटवार यांच्यासह महाराष्ट्र वनविकास महामंडळ व वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.

