
मूल नगरपरिषद च्या कंत्राटी सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी इंटक आक्रमक; मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन..
जिल्हा प्रतिनिधी !
मूल : नगर परिषद, मूल अंतर्गत कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक)च्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे अंतिम संयुक्त निवेदन पाठविण्यात आले आहे. मागण्यांवर दोन दिवसांत ठोस व समाधानकारक निर्णय न झाल्यास कायदेशीर व लोकशाही मार्गाने काम बंद आंदोलन करण्याचा इशारा इंटकने दिला आहे.

नगर परिषदेअंतर्गत कंत्राटी सफाई कामगार शहराची स्वच्छता राखण्याचे अत्यंत महत्त्वाचे व जबाबदारीचे काम अनेक वर्षांपासून नियमितपणे करीत आहेत. सन २०१९ पासून काही कामगार नगर परिषद अंतर्गत सफाईचे काम करीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यांना किमान वेतन, वेळेवर वेतन, वेतनातील अनियमितता तसेच कामाच्या अटींबाबत विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रश्नांबाबत कामगारांनी यापूर्वी पोलीस स्टेशन, नगर परिषद मूल, तहसीलदार कार्यालय तसेच संबंधित कंत्राटदारांकडे अर्ज व निवेदने सादर केली आहेत. मात्र, वारंवार तक्रारी करूनही समाधानकारक कार्यवाही झालेली नसल्याने इंटकने आता हा प्रश्न वरिष्ठ पातळीवर नेला आहे.
इंटकने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून कंत्राटी सफाई कामगारांना शासनाने निश्चित केलेल्या लागू किमान वेतन दरानुसार पूर्ण वेतन देणे, वेतनातील फरक व थकबाकी अदा करणे, दरमहा वेळेवर वेतन देणे, अनधिकृत वेतनकपातीची चौकशी करणे, वेतन व कंत्राटी नोंदींची तपासणी करणे, कामगारांच्या पूर्वीच्या तक्रारींवर कार्यवाही करणे आणि कामगारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा अन्याय करू नये, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
तसेच कामगार विभागामार्फत किमान वेतन व इतर वैधानिक लाभांची स्वतंत्र चौकशी करून कामगारांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळवून द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. चौकशीत कामगारांच्या कायदेशीर हक्कांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित कंत्राटदार किंवा जबाबदार अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘दोन दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा काम बंद’
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या अंतिम निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, निवेदन प्राप्त झाल्यापासून दोन दिवसांच्या आत संबंधित प्रशासन व कंत्राटदाराने कंत्राटी सफाई कामगारांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा इंटकच्या नेतृत्वाखाली कंत्राटी सफाई कामगार कायदेशीर व लोकशाही मार्गाचा अवलंब करून काम बंद आंदोलन तसेच नगर परिषद मूल कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद आहे.
आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची प्रशासकीय जबाबदारी नगर परिषद प्रशासन व संबंधित कंत्राटदारांची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. कामगारांच्या उदरनिर्वाहाचा, त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक परिस्थितीचा आणि शहराच्या स्वच्छता व्यवस्थेचा गांभीर्याने विचार करून शासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
इंटकचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांच्या वतीने हे निवेदन मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कामगार विभाग, नगर परिषद प्रशासन, संबंधित कंत्राटदार आणि स्थानिक प्रशासनाला माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे.
दोन दिवसांचा अल्टिमेटम दिल्याने आता प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेते, याकडे मूल शहरातील नागरिकांसह कंत्राटी सफाई कामगारांचे लक्ष लागले आहे.
.. News Jagar..

