
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
चामोर्शी : शहरासह परिसरात चोरीला गेलेले व गहाळ झालेले महागडे मोबाईल शोधून काढत चामोर्शी पोलिसांनी तब्बल १५ मोबाईल हस्तगत करून ते त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि CEIR पोर्टलच्या माध्यमातून करण्यात आलेल्या तांत्रिक तपासामुळे तब्बल २ लाख ५४ हजार रुपये किमतीचे मोबाईल परत मिळविण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे नागरिकांकडून चामोर्शी पोलिसांचे कौतुक होत आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून चामोर्शी पोलीस ठाणे हद्दीत प्रवासादरम्यान, बाजारपेठेत तसेच शेतात काम करताना नागरिकांचे मोबाईल हरवण्याच्या आणि चोरीला जाण्याच्या घटना घडत होत्या. यामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. याबाबत अनेक नागरिकांनी चामोर्शी पोलीस ठाण्यात लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या.

या घटनांची गंभीर दखल घेत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी हरवलेल्या व चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गडचिरोली उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या सल्ल्याने चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी विशेष पथक तयार केले.
या पथकात पोलीस अंमलदार भावेश वरगंटीवार आणि हर्षाली सहारे यांचा समावेश करण्यात आला. पथकाने तक्रारदारांच्या मोबाईलचे IMEI क्रमांक CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलवर नोंदवून तांत्रिक पद्धतीने त्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या ठिकाणी वापरात असलेल्या मोबाईलचा तांत्रिक माग काढत पथकाने अखेर १५ मोबाईल शोधून काढले.
पोलीस ठाण्यात छोटेखानी कार्यक्रमात मोबाईल परत
२६ ऑगस्ट रोजी चामोर्शी पोलीस ठाण्यात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या हस्ते १५ तक्रारदारांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
अनेक दिवसांपासून हरवलेला मोबाईल पुन्हा आपल्या हातात मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मोबाईल परत मिळाल्याबद्दल तक्रारदारांनी चामोर्शी पोलिसांचे मनापासून आभार मानले.
मोबाईल हरवल्यास CEIR वर तक्रार नोंदवा
मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास नागरिकांनी वेळ न दवडता जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी आणि CEIR पोर्टलवरही आवश्यक नोंद करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी केले.
तंत्रज्ञानाचा योग्य वापर, अचूक तपास आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे १५ नागरिकांना त्यांचे मौल्यवान मोबाईल पुन्हा मिळाले. चामोर्शी पोलिसांच्या या जलद, प्रभावी आणि कौतुकास्पद कामगिरीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

