
मागण्या मान्य होईपर्यंत सफाई कामगारांचा कामबंद!
मुल नगरपरिषद प्रशासनाविरोधात संताप; किमान वेतनासह विविध मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा
जिल्हा प्रतिनिधी! न्यूज जागर

मुल : मुल नगरपरिषदेतील कंत्राटी सफाई कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अखेर आक्रमक भूमिका घेत निवेदन देत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत कामावर न परतण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला असून, नगरपरिषद प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
मुल नगरपरिषदेत कार्यरत असलेले सफाई कंत्राटी कामगार गेल्या ८ ते १० वर्षांपासून सेवा बजावत असतानाही त्यांच्या वेतनात वेतन वाढ करण्यात आलेली नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. वाढत्या महागाईच्या काळात अत्यल्प वेतनावर काम करूनही प्रशासनाकडून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
कामगारांना किमान वेतनानुसार पगार देण्यात यावा, कोणत्याही कामगारासोबत गैरव्यवहार करू नये तसेच अन्यायकारक पद्धतीने सेवेतून कमी करू नये, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, सर्व सफाई कामगारांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत काम बंदच ठेवण्यात येईल, असा स्पष्ट इशारा कामगारांनी दिला आहे. मागण्या मान्य झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लेखी स्वरूपात हमी व सहमतीपत्र देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
कामगारांच्या या निर्णयामुळे शहरातील सफाई व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असून, प्रशासनाने तातडीने दखल घेऊन प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलन अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. ‘मागण्या मान्य करा, अन्यथा कामबंद सुरूच राहील’, अशी ठाम भूमिका सफाई कामगारांनी घेतली आहे.

