
कंत्राटी कामगारांच्या संघर्षाला मोठे यश! इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेसच्या (INTUC) मध्यस्थीने अखेर तोडगा; कामगारांचा कामावर तात्काळ रुजू होण्याचा निर्णय.
जिल्हा प्रतिनिधी.!न्यूज जागर
मूल नगर परिषद अंतर्गत कार्यरत कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. इंटकचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांच्या मध्यस्थीने प्रशासन व कामगार यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन मागण्यांवर तोडगा निघाला. त्यानंतर आंदोलन मागे घेत कंत्राटी कामगार तात्काळ कामावर रुजू झाले.
कंत्राटी कामगारांच्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, यासाठी कामगारांनी काम बंद आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासन आणि कामगार प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. इंटकचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी मध्यस्थीची भूमिका बजावत कामगारांच्या मागण्या प्रशासनासमोर ठामपणे मांडल्या. अखेर चर्चेतून तोडगा काढण्यात प्रशासनाला यश आले.
या चर्चेवेळी मुख्याधिकारी संदीप दोडे, नगर परिषद अध्यक्ष सौ. एकता समर्थ, आरोग्य सभापती राकेश रत्नावार, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, पाणीपुरवठा सभापती विलास कागदेलवार, इंटकचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ, जिल्हा उपाध्यक्ष चेतन कामडे, नगरसेवक विवेक मुत्यलवार, अतुल गोवर्धन, रितीक गोयल,
यांच्यासह कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामगारांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा होऊन मागण्यांबाबत तोडगा निघाल्यानंतर कामगारांनी आंदोलन समाप्त केले. त्यानंतर सर्व कंत्राटी कामगारांनी कोणताही विलंब न करता आपापल्या कामावर रुजू होत आपली सेवा पूर्ववत सुरू केली.

एकजुटीच्या संघर्षाला यश..
कामगारांनी संघटितपणे उभारलेल्या लढ्याला आणि इंटकच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले. “कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी इंटक सदैव त्यांच्या पाठीशी राहील,” अशी भूमिका इंटकचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, मागण्यांवर तोडगा निघाल्याने कंत्राटी कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण असून, मूल नगर परिषदेसमोर कामगारांनी एकत्र येत आनंद व्यक्त केला.
कामगारांची एकजूट, संघटनेचा पाठपुरावा आणि प्रशासनाची सकारात्मक भूमिका यामुळे अखेर संघर्षाची सांगता झाली.
… News Jagar ….

