
भामरागड : भामरागड तालुक्यातील आदिवासी गर्भवती महिला जन्नी नेताम (वय ३४) यांच्या प्रसूतीनंतर झालेल्या दुर्दैवी मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच त्यांच्या कुटुंबाला किमान २५ लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI), गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने तहसीलदार, भामरागड यांच्याकडे करण्यात आली.
लोकमतमध्ये १३ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ११ ऑगस्ट रोजी रात्री प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर जन्नी नेताम यांना भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आवश्यक वैद्यकीय सुविधा व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. अहेरीकडे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह अहेरी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला; मात्र शवविच्छेदनासाठी तब्बल १४ तास प्रतीक्षा करावी लागल्याचे वृत्तात नमूद आहे.
यावेळी कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “दुर्गम आदिवासी भागातील एका गर्भवती महिलेचा वेळेवर आणि योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. आरोग्य सुविधा कागदावर न राहता त्या प्रत्यक्षात नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. भामरागडसारख्या दुर्गम भागातील गर्भवती महिलांना उपचारासाठी दुसऱ्या तालुक्यात रेफर करण्याची वेळ का येते, याची प्रशासनाने जबाबदारी निश्चित करावी. जन्नी नेताम यांच्या मृत्यूला जर वैद्यकीय हलगर्जीपणा किंवा प्रशासनिक दुर्लक्ष कारणीभूत असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत CPI हा प्रश्न लावून धरेल.”

CPIने भामरागड ग्रामीण रुग्णालयातील उपचार व्यवस्था, उपलब्ध डॉक्टर व वैद्यकीय सुविधा तसेच अहेरीकडे करण्यात आलेल्या रेफरल प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. उपचारात अथवा रुग्णालयीन व्यवस्थेत हलगर्जीपणा किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.
तसेच भामरागड तालुक्यात गर्भवती महिलांसाठी २४ तास प्रसूती व आपत्कालीन आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी. ग्रामीण रुग्णालयात आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि रुग्णवाहिका पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी CPIने केली.
या प्रकरणाचा सविस्तर चौकशी अहवाल CPI, गडचिरोली जिल्ह्याला लेखी स्वरूपात देण्यात यावा आणि दोषी आढळलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर केलेल्या कारवाईची माहितीही देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
तहसीलदारांना निवेदन देताना कॉ. सचिन मोतकुरवार, CPI जिल्हा सहसचिव; कॉ. सूरज जककुलवार, जिल्हा सदस्य; कॉ. रमेश कालंगा, AISF तालुका अध्यक्ष, भामरागड; तसेच मृत जन्नी नेताम यांचे पती पुसू नैताम यांच्यासह तालुक्यातील नागरिक व पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते.

