
रेगडी : चामोर्शी तालुक्यातील रेगडी येथील दिना जलाशयावर मत्स्य व्यवसायाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिना उन्नयन मत्स्य पालन सहकारी संस्था, विकासपल्लीचा जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. जिल्हा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष रंजन अनंत मुजुमदार यांचा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दिना जलाशयातील मत्स्य पालनाचा व्यवसाय विकासपल्ली आणि रेगडी येथील समित्यांच्या माध्यमातून चालविला जातो. या क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरी करत दिना उन्नयन मत्स्य पालन सहकारी संस्थेने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासोबतच जलाशयातील मत्स्य संसाधनांचा योग्य पद्धतीने उपयोग करण्याचे काम संस्थेकडून केले जात आहे.
संस्थेच्या सातत्यपूर्ण कार्याची आणि मत्स्य व्यवसायातील योगदानाची दखल घेत जिल्हा गौरव पुरस्कारासाठी संस्थेची निवड करण्यात आली. हा पुरस्कार संस्थेच्या पदाधिकारी, सभासद तसेच मत्स्य व्यवसायाशी संबंधित कामगारांच्या मेहनतीचा गौरव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

पुरस्कार स्वीकारताना संस्थेचे अध्यक्ष रंजन अनंत मुजुमदार यांनी संस्थेच्या कार्यात योगदान देणाऱ्या सर्व पदाधिकारी व सभासदांचे आभार मानले. या सन्मानामुळे भविष्यात मत्स्य व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी आणि परिसरातील मत्स्य व्यवसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी ऊर्जा मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी विकासपल्लीचे उपसरपंच मिहीर विश्वास, सोमनाथ वैद्य, प्रशांत शाहा, तारक हलदार यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सभासद आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दिना उन्नयन मत्स्य पालन सहकारी संस्थेला मिळालेल्या या सन्मानामुळे विकासपल्ली व रेगडी परिसरातील मत्स्य व्यवसायाला जिल्हास्तरावर नवी ओळख मिळाली आहे. पुरस्कारामुळे परिसरातील मत्स्य व्यवसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, संस्थेच्या पदाधिकारी व सभासदांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

