
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
चामोर्शी : तालुक्यातील शेतकऱ्यांनी फेडरेशन महामंडळाला विकलेल्या मक्क्याचा मोबदला मागील चार महिन्यांपासून मिळालेला नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणी मक्का उत्पादक शेतकऱ्यांनी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन निवेदन सादर केले.
फेडरेशन महामंडळाला मक्का विकून चार महिने उलटले असूनही विक्री केलेल्या मालाची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे शेतीचा खर्च, कर्जाची परतफेड तसेच आगामी हंगामाची तयारी करताना शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विक्री केलेल्या मक्क्याचा प्रलंबित मोबदला तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली. डॉ. देवराव होळी यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत संबंधित पातळीवर पाठपुरावा करण्याची भूमिका घेतली.
यावेळी सिमूलताला येथील शेतकरी विमल हाजरा, पुलिन रॉय, नारायण बच्चड, किशोर सरदार, सुधाकर मडावी, सुशांत हलदार, रंजन बच्चड, पवित्र बच्चड, प्रामाणित रॉय, विपुल गाईने व मनोज सिकदार यांच्यासह मक्का उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

