
गडचिरोली : नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण, शाश्वत आणि गतिमान विकास साधून सन २०४७ पर्यंत जिल्ह्याला प्रगतीच्या शिखरावर नेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ सादरीकरण व संबोधन कार्यक्रम तसेच जिल्हा वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘जिल्हा गौरव पुरस्कार वितरण सोहळा’ २६ ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने ‘व्हिजन गडचिरोली २०४७’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आगामी २५ वर्षांत गडचिरोली जिल्ह्याचा विकास कोणत्या दिशेने व्हावा, नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत, तसेच जिल्ह्यातील जल, जमीन, जंगल आणि मानवी संसाधनांचा योग्य व परिणामकारक वापर करून शाश्वत विकास कसा साधता येईल, यावर सविस्तर विचारमंथन करण्यात आले.
गडचिरोलीच्या विकासासाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार, कृषी, उद्योग, पर्यटन, वनसंपदा आणि कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन नियोजनाची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. स्थानिक नागरिकांच्या सहभागातून आणि उपलब्ध नैसर्गिक व मानवी संसाधनांचा योग्य वापर करून जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार या उपक्रमातून व्यक्त करण्यात आला.

या विचारमंथन कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, अभ्यासू नागरिक तसेच वृत्तपत्र, दूरचित्रवाणी आणि डिजिटल माध्यमांचे पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्याच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ‘जिल्हा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल एटापल्ली येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ. प. गट) महिला तालुका अध्यक्षा पौर्णिमा श्रीरामवार तसेच सामाजिक कार्यकर्त्या सुनीता चांदेकर यांना मान्यवरांच्या हस्ते जिल्हा गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
दुर्गम आणि सीमावर्ती एटापल्ली तालुक्यात सामाजिक कार्याच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या सौ पौर्णिमा शैलेश श्रीरामवार आणि सौ सुनीता मोहन चांदेकर यांचा जिल्हास्तरीय पुरस्काराने झालेला सन्मान हा एटापल्ली तालुक्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. पुरस्काराची माहिती समोर येताच एटापल्ली परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, महिला पदाधिकारी, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून दोन्ही पुरस्कारप्राप्त महिलांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
गडचिरोलीच्या विकासाचा दूरदृष्टीने विचार करणारा ‘व्हिजन २०४७’ उपक्रम आणि जिल्ह्यासाठी विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव यामुळे जिल्हा वर्धापन दिनाला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले. विकसित, सक्षम आणि शाश्वत गडचिरोली घडविण्यासाठी अशा उपक्रमांतून सकारात्मक विचारमंथनाला चालना मिळणे ही जिल्ह्याच्या भविष्यासाठी आशादायी बाब ठरली आहे.

