
जिल्हा वर्धापन दिनी कर्तृत्ववानांचा ‘जिल्हा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान; शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग, शेतीसह सर्वांगीण विकासाचा संकल्प
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली, दि. २६ ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्याच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात ‘आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ या संकल्पनेचा दमदार शुभारंभ करण्यात आला. शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती, सिंचन, उद्योग, पर्यटन आणि पायाभूत सुविधांना नवी दिशा देत सन २०४७ पर्यंत गडचिरोलीला विकसित, सक्षम आणि समृद्ध जिल्हा बनविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमात जिल्ह्याच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रगतीशील शेतकरी, नवउद्योजक, उद्योजक, महिला उद्योजक, पत्रकार, समाजसेवक, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा ‘जिल्हा गौरव पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. मान्यवरांना शिल्ड, डायरी, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’चे मुख्य प्रवर्तक, भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी यावेळी व्हिजनचे सादरीकरण केले. १६ व १७ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या दोन दिवसीय कार्यशाळेत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मांडलेल्या सूचना, संकल्पना आणि विकासाच्या दिशांचा आढावा त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.
जिल्हा निर्मितीच्या शिल्पकारांना अभिवादन
गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ ऑगस्ट १९८२ रोजी झाली. स्वतंत्र गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीसाठी योगदान देणारे तत्कालीन लोकप्रतिनिधी कै. बाबुराव मडावी, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार पेंटराम तलांडी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या संघर्षाचे यावेळी स्मरण करण्यात आले.
४४ वर्षांचा विकासाचा प्रवास पूर्ण करून आता गडचिरोलीच्या पुढील वाटचालीसाठी ठोस आणि दूरदृष्टीचा विकास आराखडा आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. होळी यांनी केले.
‘गडचिरोली २०४७’साठी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर भर
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयएएस-आयपीएस अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस प्रशासनापासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येकाने आपली कर्तव्ये व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्यास विकासाला मोठी गती मिळू शकते. शासन, प्रशासन आणि नागरिक यांचा समन्वय हा विकसित गडचिरोलीचा कणा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
अहेरीला अधिक प्रशासकीय अधिकार देण्याची मागणी
अहेरी उपविभागातील नागरिकांना प्रशासन अधिक जवळून उपलब्ध व्हावे, यासाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, या कार्यालयाला शासनाच्या आदेशानुसार आवश्यक प्रशासकीय व आर्थिक अधिकार पूर्णपणे मिळणे गरजेचे असल्याचे डॉ. होळी यांनी सांगितले.
अहेरी उपजिल्ह्याला आवश्यक अधिकार मिळवून देण्यासाठी ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’च्या माध्यमातून शासनाकडे प्रभावी पाठपुरावा करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
शिक्षणासाठी स्वतंत्र ‘विकास आराखडा’
जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी ‘शैक्षणिक विकास आराखडा – गडचिरोली २०४७’ तयार करण्याची मागणी करण्यात आली. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे टप्प्याटप्प्याने डिजिटल शाळांमध्ये रूपांतर, निवडक शासकीय शाळांचा आधुनिक पद्धतीने विकास तसेच आश्रमशाळांचे डिजिटल व मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर करण्यावर भर देण्यात आला.
आधुनिक प्रयोगशाळा, ग्रंथालये, तंत्रज्ञानाधारित शिक्षण आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली.
वैद्यकीय महाविद्यालयाला ‘गोंडवाना’ नाव देण्याचा मानस
गडचिरोलीतील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी स्वतंत्र आरोग्य विकास आराखडा तयार करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. गडचिरोली येथे उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ‘गोंडवाना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ असे नामकरण करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची घोषणा डॉ. होळी यांनी केली.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाची प्रक्रिया गतीने पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यासाठीही गडचिरोलीकरांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सर्व क्षेत्रांना जोडून विकसित गडचिरोलीचा संकल्प
शिक्षण, आरोग्य, शेती, सिंचन, रोजगार, उद्योग, पर्यटन आणि पायाभूत सुविधांचा समन्वित विकास साधत २०४७ पर्यंत गडचिरोलीला विकसित जिल्हा बनविणे हेच ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’चे अंतिम ध्येय आहे, असे डॉ. देवराव होळी यांनी स्पष्ट केले.
शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, उद्योजक, शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकजुटीने काम केल्यास गडचिरोलीचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास शक्य असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोककलावंत विजय शेंडे व आदिवासी विकास परिषदेचे जिल्हा महासचिव उमेश उईके यांनी केले.
‘४४ वर्षांचा प्रवास पूर्ण; आता विकसित गडचिरोलीच्या नव्या पर्वाची सुरुवात!’ या निर्धाराने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

