
आशा व गटप्रवर्तकांचा पंचायत समितीवर एल्गार!
३१ महिन्यांच्या थकित कोरोना भत्त्यासाठी ब्रह्मपुरीत दे धडक मोर्चा; १ सप्टेंबरला दिल्लीतील संसद भवनावर धडक
न्यूज जागर जिल्हा प्रतिनिधी!

ब्रह्मपुरी :कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गावागावांत आरोग्यसेवा बजावणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आता आंदोलनाची धार तीव्र झाली आहे. शासनाचे आदेश असतानाही तब्बल ३१ महिन्यांचा दरमहा एक हजार रुपये कोरोना प्रोत्साहन भत्ता थकीत असल्याने आशा व गटप्रवर्तकांनी संताप व्यक्त केला.
आयटक संघटनेच्या नेतृत्वाखाली २५ ऑगस्ट रोजी ब्रह्मपुरी पंचायत समिती कार्यालयावर ‘दे धडक मोर्चा’ काढण्यात आला. आयटकचे राज्य सचिव कॉ. विनोद झोडगे, तालुका अध्यक्ष कॉ. वनिता तिवाडे, सचिव कॉ. वर्षा घुमे व कार्याध्यक्ष कॉ. ज्योत्स्ना ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आशा व गटप्रवर्तकांनी पंचायत समिती परिसरात जोरदार निदर्शने केली.
आंदोलकांनी गट विकास अधिकारी तसेच सहाय्यक गट विकास अधिकारी रवींद्र घुबडे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. थकीत कोरोना प्रोत्साहन भत्ता तातडीने अदा करावा, ऑनलाइन कामाची सक्ती थांबवावी, विनामोबदला कामे बंद करावीत तसेच ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सचिवपदाचा दिलेला सामूहिक राजीनामा तातडीने मंजूर करावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
दरम्यान, गट विकास अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी सकारात्मक चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ग्रामपंचायत स्तरावरून थकीत कोरोना प्रोत्साहन भत्ता तातडीने वितरित करण्याबाबत सर्व ग्रामपंचायतींना लेखी आदेश देण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
२६ हजार रुपये वेतनाची मागणी
आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन कायमस्वरूपी समायोजन करावे, किमान २६ हजार रुपये मासिक वेतन द्यावे, पाच हजार रुपये दिवाळी बोनस द्यावा, पगारी रजा मंजूर करावी तसेच सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६० वरून ६५ वर्षे करावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी मांडल्या.
१ सप्टेंबरला दिल्लीतील संसद भवनावर धडक
केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरोधात ‘बदलाव जरूरी है’ असा नारा देत येत्या १ सप्टेंबर २०२६ रोजी दिल्लीतील संसद भवनावर देशव्यापी विशाल आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कॉ. विनोद झोडगे यांनी दिली. या आंदोलनात शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या आंदोलनात हिरकण्या सोनुले, अलका जिबकाटे, हिमाली वाघमारे, सीमा शेंडे, गीता कोटगले, वैशाली लाडसे, छाया जेनगटे, वीणा वलके, किरण बगमारे, जयश्री कोसे, करुणा उरकुडे, स्वामिनी पत्रे यांच्यासह ब्रह्मपुरी तालुक्यातील शेकडो आशा व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.
.. News Jagar…..

