
चामोर्शी : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या गडचिरोली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चामोर्शी-मूल मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला अचानक वेग आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. महिनोन्महिने रस्त्यांची दुरवस्था कायम असताना मंत्री दौऱ्यावर येणार असल्याचे समजताच प्रशासनाची यंत्रणा सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे ‘सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी विभागाला वेळ नाही, मात्र मंत्र्यांच्या दौऱ्यासाठी तत्परता का?’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
चामोर्शी तालुक्यातील अनेक प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांची अवस्था पावसाळ्यात अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. काही ठिकाणी चिखलामुळे वाहन घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक तसेच प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे अपघाताचा धोका वाढला असून, नागरिकांनी अनेकदा संबंधित विभागाकडे रस्ते दुरुस्तीची मागणी केली होती.
मात्र नागरिकांच्या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. रस्त्यांची दुरवस्था महिन्यांपासून कायम असतानाही कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याऐवजी आता मंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खड्डे बुजविण्याची लगबग सुरू झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही डागडुजी केवळ दौरा सुरळीत पार पाडण्यासाठीची तात्पुरती उपाययोजना ठरू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

‘रस्ते केवळ मंत्र्यांच्या दौऱ्यासाठीच दुरुस्त होतात का?’ असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. मंत्र्यांच्या सुरक्षित प्रवासाला महत्त्व आहेच; मात्र दररोज याच रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता तितकीच महत्त्वाची आहे. प्रशासनाने एखाद्या मंत्री अथवा वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दौऱ्याची वाट न पाहता नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन रस्त्यांची नियमित देखभाल करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
चामोर्शी-मूल मार्गासह तालुक्यातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची केवळ वरवरची डागडुजी न करता तांत्रिक निकषांनुसार दर्जेदार व टिकाऊ दुरुस्ती करण्यात यावी. कामाच्या गुणवत्तेवर संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून सार्वजनिक निधीचा योग्य वापर सुनिश्चित करावा, अशी मागणीही पुढे येत आहे.
मंत्री दौरा संपल्यानंतर पुन्हा रस्त्यांची अवस्था ‘जैसे थे’ होऊ नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. ‘मंत्री येणार म्हणून PWD जागे झाले, मग सामान्य जनतेच्या जीवासाठी विभाग कधी कायमचा जागा होणार?’ हा सवाल सध्या चामोर्शी तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

