
माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे जोरदार मागणी
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचा विकास केवळ रस्ते, इमारती आणि पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न ठेवता पर्यावरण संवर्धन आणि स्थानिक रोजगारनिर्मितीचा समतोल साधणारा असावा, या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा नियोजनबद्ध पद्धतीने बहुउपयोगी वृक्षलागवड करण्यात यावी, अशी जोरदार मागणी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ या संकल्पनेत पर्यावरण संवर्धनासोबतच स्थानिक नागरिकांचे उत्पन्न वाढविणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे याला महत्त्व देण्यात यावे, अशी भूमिका डॉ. होळी यांनी मांडली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील PWD अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा स्थानिक हवामान व मातीला अनुकूल असलेल्या विविध बहुउपयोगी वृक्षांची लागवड करण्याची मागणी त्यांनी केली.
यामध्ये आंबा, चिंच, मोह, ताड, कडुलिंब, वड, पिंपळ, आवळा, निलगिरी, चिकू, बदाम यांसह स्थानिक परिस्थितीला अनुरूप इतर वृक्षांचा समावेश करण्यात यावा, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
वृक्षलागवडीतून पर्यावरणासोबत रोजगारालाही चालना
रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड झाल्यास रस्त्यांचे सौंदर्य वाढण्यासोबतच तापमान नियंत्रण, प्रदूषण कमी करणे, मृदासंवर्धन आणि जैवविविधतेचे संरक्षण यास मोठी मदत होऊ शकते. भविष्यात या वृक्षांपासून मिळणारी फळे, बिया, फुले व इतर वनउपज स्थानिक नागरिकांसाठी उत्पन्नाचे साधन ठरू शकते. त्यामुळे वृक्षलागवड हा केवळ पर्यावरणाचा विषय न राहता ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा उपक्रम ठरू शकतो.
ग्रामपंचायत, बचत गट आणि युवकांना जबाबदारी द्या
लागवड केलेली झाडे जगविणे हीच खरी कसोटी असल्याचे लक्षात घेऊन त्यांच्या संरक्षण व संगोपनाची जबाबदारी स्थानिक ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट आणि युवक मंडळांना निश्चितपणे देण्यात यावी, अशी सूचनाही डॉ. होळी यांनी केली आहे. त्यामुळे वृक्षलागवड केवळ कागदावरील अभियान न राहता त्याचे दीर्घकालीन संवर्धन होण्यास मदत होईल.
‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७’ अंतर्गत PWD रस्त्यांच्या दुतर्फा बहुउपयोगी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचा विशेष कार्यक्रम राबवून त्यासाठी स्वतंत्र निधी, ठोस नियोजन आणि आवश्यक प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली आहे.
“विकासाच्या मार्गावर हिरवाईची साथ; रोजगारासोबत पर्यावरणाचीही जपणूक” असा दुहेरी उद्देश साधणारा हा उपक्रम गडचिरोलीच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

