
फटाक्यांच्या आतषबाजीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त स्वागत; विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा
चामोर्शी | २७ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वर तीर्थक्षेत्राच्या चामोर्शी नगरीत प्रथम आगमन होताच भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. भाजप तालुकाध्यक्षा रोशनीताई स्वप्निल वरघंटे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तसेच फटाक्यांची आतषबाजी करत मंत्र्यांचे जंगी स्वागत केले.
मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले हे व्यस्त दौऱ्यावर असतानाही कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी आपला ताफा थांबविला. यावेळी त्यांनी उपस्थित भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आवर्जून भेट घेत संवाद साधला आणि आस्थेने विचारपूस केली. मंत्र्यांनी दाखविलेल्या या आपुलकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा
गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रलंबित विकासकामांना गती मिळावी, ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती व मजबुतीकरण व्हावे, तसेच चामोर्शी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावावा, अशी अपेक्षा यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
मंत्र्यांच्या चामोर्शी दौऱ्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित विविध प्रश्न मार्गी लागतील आणि विकासकामांना चालना मिळेल, असा विश्वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजप तालुकाध्यक्षा रोशनी स्वप्निल वरघंटे, भाजप जिल्हा सचिव दिलीप चलाख, किसान मोर्चा जिल्हा महामंत्री साईनाथ बुरांडे, भाजप ज्येष्ठ नेते माणिक कोहळे, श्रावण पाटील सोनटक्के, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष कविताताई किरमे, तालुका महामंत्री वासुदेव चिचघरे, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नीरज रामानुजमवार, माजी शहराध्यक्ष सोपान नैताम, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यश गण्यारपवार, ज्येष्ठ नेते रमेश नैताम, रामचंद्र वरवाडे, पंकज पेशटीवार, विनोद किरमे, मनिषा बोधनवार यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

