
मध्यरात्री पुलावर मगरीचा वावर; वन विभागाच्या पथकाने मगरीला नदीपात्रात हाकलले

नागरिकांनी व मच्छीमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन
नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी

गडचिरोली चामोर्शी:चामोर्शी शहराजवळील वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेज पुलावर मध्यरात्री मगर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास नदीपात्रातून मगर थेट पुलावर आल्याची घटना उघडकीस आली. मगरीला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी जमली होती. मात्र, वन विभागाच्या पथकाने वेळीच घटनास्थळी धाव घेत मगरीला नदीपात्रात हाकलून लावल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
कुत्र्यांच्या भुंकण्याने प्रकार उघडकीस
चिचडोह बॅरेज पुलावरील रस्ता सकाळपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुला असतो. त्यानंतर लोंढोली आणि चामोर्शीच्या दोन्ही बाजूंचे प्रवेशद्वार बंद केले जातात. पुलाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन सुरक्षा रक्षक तैनात असतात.
दि. ८ ऑक्टोबरच्या रात्री साडेअकराच्या सुमारास वैनगंगा नदीच्या पात्रातून मगर पुलावर आली. यावेळी पुलावरील कुत्रे मगरीला पाहून जोरजोरात भुंकू लागले. कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे हा प्रकार लक्षात आल्यानंतर सुरक्षा रक्षक लिखित धोडरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून घोट पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता विकास दूधबावरे यांच्याशी संपर्क साधला.
वन विभागाची तातडीने धाव
शाखा अभियंता विकास दूधबावरे यांनी या घटनेची माहिती चामोर्शी वन विभागाचे क्षेत्रसहाय्यक सलीम कुरेशी यांना दिली. त्यानंतर तलोधी येथील वनरक्षक प्रमोद धाडसे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मगर पुलावरच होती आणि ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दीही जमली होती. वन विभागाच्या पथकाने परिस्थिती हाताळत मगरीला सुरक्षितपणे वैनगंगा नदीच्या पात्रात हाकलून लावले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
वैनगंगा नदीत मगरीचे अस्तित्व; नागरिकांनी सावध राहावे!
चिचडोह बॅरेज पुलावर मगर आढळून आल्यानंतर वैनगंगा नदीच्या पात्रात मगरींचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नदीपात्रात उतरणाऱ्या नागरिकांनी, मच्छीमारांनी तसेच नदीकाठी जाणाऱ्या व्यक्तींनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोणताही धोका पत्करू नये आणि नदीपात्रात उतरताना सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
–विकास दूधबावरे, शाखाधिकारी, पाटबंधारे विभाग, घोट

