
पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध; रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचा निर्धार – सुधाकर कोहळे

नितेश गट्टीवार जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (अहेरी) | दि. ८ ऑक्टोबर :नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपाइं-पीरिपा महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांच्या प्रचारार्थ अहेरी येथे आयोजित पदवीधर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पदवीधर मतदारांशी संवाद साधत महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी केले.

महागाव रोडवरील इंडियन पॅलेस फंक्शन हॉल येथे आयोजित या मेळाव्याला महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उपस्थित मान्यवरांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पदवीधरांच्या हक्कांसाठी महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा!
मेळाव्यात मार्गदर्शन करताना डॉ. अशोक नेते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या विजयासाठी पदवीधर मतदारांनी एकजुटीने पुढे यावे, असे आवाहन केले. पदवीधरांच्या समस्या, रोजगाराचे प्रश्न आणि त्यांच्या विविध मागण्यांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी सक्षम नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : सुधाकर कोहळे
यावेळी महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी उपस्थित पदवीधर मतदारांना संबोधित करताना पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची ग्वाही दिली.
ते म्हणाले, “पदवीधर मतदारसंघात काम करण्याची संधी मला द्यावी. पदवीधरांचे प्रश्न, शाळा संचालकांच्या समस्या तसेच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे. माझ्यात काम करण्याची ताकद असून, काम करून दाखविण्याची हिंमतही आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पदवीधरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांच्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही कोहळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
या मेळाव्याला भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, अहेरीच्या नगराध्यक्ष मोहूर्ले ताई, ज्येष्ठ नेते रवींद्र ओल्लालवार, प्रकाश गुड्डेलीवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्ता, विनोद आकनपलीवार, अहेरी तालुकाध्यक्ष विकास तोडसाम, मुलचेरा तालुकाध्यक्ष संजय सरकार, एटापल्ली तालुकाध्यक्ष प्रसाद जक्कुलवार, भामरागड तालुकाध्यक्ष अर्जुन आलाम आणि सिरोंचा तालुकाध्यक्ष श्रीकांत राऊत यांच्यासह महायुतीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पदवीधर मतदारांशी संवाद साधणे, त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करणे आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारासाठी पाठिंबा मिळविणे, या दृष्टीने अहेरीतील हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरला.

