
पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत गणेश विसर्जन
चामोर्शी : येथील पोलीस स्टेशनमध्ये विराजमान झालेल्या श्री गणरायाला शुक्रवारी भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत गणरायाची विधिवत पूजा-अर्चा करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
यावेळी गणरायाच्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता. आकर्षक सजावट केलेल्या रथातून श्री गणेशाची मूर्ती विसर्जनासाठी नेण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.

चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण विसर्जन सोहळा शांतता, शिस्त आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष दक्षता घेतली.
विसर्जन मिरवणुकीत पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप देताना उपस्थितांच्या चेहऱ्यावर भावुकता दिसून आली.

