
छत्तीसगडमधील अतिवृष्टीचा परिणाम; चिचडोह बॅरेजचे चार दरवाजे उघडले, १,३४८ क्यूमेक्स विसर्ग
गडचिरोली : छत्तीसगड राज्यातील इंद्रावती नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार अतिवृष्टीमुळे इंद्रावती नदीने धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे भामरागड, अहेरी आणि सिरोंचा तालुक्यांतील इंद्रावती नदीकाठच्या पूरप्रवण गावांमध्ये प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे तसेच आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता चिचडोह बॅरेजचे चार उभे उचल दरवाजे उघडण्यात आले असून नदीपात्रात १,३४८ क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीला होणारा पाण्याचा येवा लक्षात घेऊन परिस्थितीनुसार विसर्गात वाढ किंवा घट केली जाऊ शकते. त्यामुळे वैनगंगा नदीपात्रात अथवा नदीकाठच्या परिसरात आवागमन करणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात सरासरी ३४.७ मिमी पाऊस
गडचिरोली जिल्ह्यातही गेल्या २४ तासांत विविध भागांत पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील सर्व ४५ पैकी ४५ पर्जन्यमापक केंद्रांवर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्याची सरासरी पर्जन्यमान ३४.७ मिमी इतकी आहे.
तालुकानिहाय पावसात कोरची ६७.४ मिमी, धानोरा ६७.१ मिमी, भामरागड ५६.५ मिमी, कुरखेडा ५०.३ मिमी, एटापल्ली ५०.२ मिमी आणि अहेरी ३८.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मुरुमगावात सर्वाधिक ९२.६ मिमी पाऊस
जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस धानोरा तालुक्यातील मुरुमगाव येथे ९२.६ मिमी नोंदविण्यात आला. त्यापाठोपाठ कोरची येथे ८३.४ मिमी, मसेली येथे ७६.३ मिमी, पेंढरी येथे ७२.४ मिमी, भामरागड तालुक्यातील ताडगाव येथे ६६ मिमी आणि एटापल्ली तालुक्यातील गट्टा येथे ६४.८ मिमी पाऊस झाला.
इंद्रावतीच्या वाढलेल्या पाणीपातळीच्या पार्श्वभूमीवर भामरागड, अहेरी आणि सिरोंचा तालुक्यांतील नदीकाठच्या गावांनी विशेष सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. नदीपात्र, नाले, पूल आणि सखल भागात विनाकारण जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भामरागड येथील पर्लकोटा नदीची पाण्याची पातळी वाढत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. १३० डी (NH-130D) वरील पर्लकोटा नदीचा जुना पूल पाण्याखाली गेला असून, सुरक्षेच्या कारणास्तव पुलाच्या दोन्ही बाजूंना पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बॅरिकेटिंग करण्यात आले आहे.
पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत आहे त्यामुळे भामरागड ते आलापल्ली वाहतूक बंद करण्यात आलेली आहे.

