
साहिलला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार
नागपूर
देशातील सर्वोच्च शिक्षण संस्था मानल्या जाणाऱ्या ‘आयआयटी बॉम्बे’ (IIT Bombay) सारख्या ठिकाणी शिकणाऱ्या साहिल वाकोडे Sahil Wakode या आश्वासक दलित तरुणाचा जातीय भेदभावातून आणि मानसिक छळातून झालेला दुर्दैवी अंत हा केवळ एक मृत्यू नसून ती संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेतील जातीय मानसिकतेने केलेली ‘संस्थात्मक हत्या’ आहे, असा घणाघाती आरोप करत आज नागपूरचे संविधान चौक जनआक्रोशाने आणि संतापाच्या लाटेने थरथरून गेले!

साहिलच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायकारक आघातामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी आज सकाळी ११ वाजता संविधान चौकात एकत्र येत प्रशासनाविरोधात आणि आरोपींविरोधात जोरदार निदर्शने केली. “साहिलला न्याय मिळालाच पाहिजे!”, “जातीयवादी प्रवृत्तींचा धिक्कार असो!” अशा जनआक्रोशाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. बहुजन समाज पार्टी, नागपूर शहराच्या वतीने आयोजित या आक्रमक आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार व शहराध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे यांनी केले.

”आमचे लेकरू परत येणार नाही, पण आरोपींना तुरुंगात डांबल्याशिवाय शांत बसणार नाही!” साहिलच्या कुटुंबीयांनी अत्यंत आक्रोशाने मांडलेल्या व्यथांवरून हे स्पष्ट होते की, त्याच्यावर सतत जातीय अपमान, छळ आणि भेदभाव केला गेला. एफआयआर (FIR) मध्ये स्पष्ट नाव नोंदवूनही आरोपी मोकाट फिरत आहेत, ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. राज्य सरकारने आणि पोलीस प्रशासनाने साहिलच्या कुटुंबाच्या अश्रूंची किंमत ओळखून या प्रकरणातील नराधमांना आणि दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी या वेळी अत्यंत आक्रमकपणे करण्यात आली.

बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख व कडक मागण्या:
१. तात्काळ अटक: FIR मध्ये नमूद असलेल्या सर्व आरोपींना कायद्याचा बडगा दाखवून तात्काळ अटक करण्यात यावी.
२. कालबद्ध व स्वतंत्र चौकशी: साहिलच्या मृत्यूची निष्पक्ष, स्वतंत्र आणि उच्चस्तरीय कालबद्ध चौकशी करण्यात यावी.
३. कठोर कायदेशीर कारवाई: या प्रकरणात SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Atrocity Act) आरोपींवर सर्वात कठोर कारवाई करण्यात यावी.
४. पुरावे जप्त करा: हॉस्टेल व परीक्षा कक्षातील CCTV फुटेज, डिजिटल पुरावे, व्हॉट्सॲप चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स तपासात समाविष्ट करून पारदर्शक तपास व्हावा.
५. सुरक्षिततेची हमी: उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी व तक्रार निवारणासाठी स्वतंत्र व गोपनीय यंत्रणा तात्काळ उभारली जावी.
या आंदोलनात बहुजन समाज पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते न्यायासाठी रस्त्यावर उतरले होते. यात प्रामुख्याने प्रदेश सचिव: प्रफुल मानके, विवेक हाडके, मीडिया प्रभारी: उत्तम शेवाळे, शहर महासचिव: मंगेश नागदिवे, अंकित फुल, शहर उपाध्यक्ष: जितू हिवरकर, शहर सचिव: अमित बनसोड, विधानसभा अध्यक्ष: सहदेव पिल्लेवान (दक्षिण नागपूर), सौरभ जामगडे (दक्षिण-पश्चिम नागपूर), मनोज निकाळजे (पश्चिम नागपूर), पदाधिकारी व प्रभारी: अभय डोंगरे (मध्य प्रभारी), राकेश शहरे (सचिव), रामटेके साहेब (पश्चिम प्रभारी), रौनक जामगडे (दक्षिण-पश्चिम महासचिव) तसेच बहुजन समाज पक्षाचे मुख्य पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते या जनआक्रोशात सहभागी झाले होते.
“जर शासन आणि प्रशासनाने साहिल वाकोडे यांच्या कुटुंबाला तातडीने न्याय दिला नाही आणि आरोपींना तात्काळ गजाआड केले नाही, तर हा जनआक्रोश केवळ नागपूरपुरता मर्यादित राहणार नाही; संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाही व घटनात्मक मार्गाने याहूनही अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा निर्वाणीचा तीव्र इशारा या प्रसंगी बहुजन समाज पक्षाच्या वतीने देण्यात आला.
जय भीम! जय संविधान!

