
वर्धा – आर्वी पंचायत समितीतील मनरेगा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रणाली कसार यांनी २५ लाख २८ हजार ३१९ रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केला. याप्रकरणी आर्वीच्या गटविकास अधिकार्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत शिकामोर्तब झाला.
तो प्राथमिक चौकशी अहवाल जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना सादर होताच एपीओ प्रणाली कसार यांनी संबंधित अपहारीत रकम उपजिल्हाधिकारी (रोहयो) विभागाच्या शासकीय बँक खात्यात भरल्याचे आता पुढे आले आहे. कसारे यांनी त्यांच्यावरील कारवाई टळावी या हेतूने ही भूमिका घेतल्याची चर्चा सध्या रोहयोच्या अधिकारी-कर्मचार्यांत रंगत आहे.
आर्वी पंचायत समितीतील मनरेगा एपीओ प्रणाली कसार यांनी केलेल्या अपहाराची सखोल चौकशीसाठी जिल्हास्तरीय चौकशी समिती आता कुठल्याही क्षणी गठीत होणार आहे. हे गंभीर प्रकरण कायदेशीर फौजदारी कारवाईसाठी अद्यापही पोलिसांकडे वळते करण्यात आले नसल्याने तालुका व जिल्हास्तरावरील अधिकार्यांवर दडपण कुणाचे, असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जात असतानाच आर्वीच्या गटविकास अधिकार्यांनी जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना प्राथमिक चौकशी अहवाल सादर केल्यावर मनरेगाचे आयुत वर्धा जिल्ह्याच्या दौर्यावर असताना एपीओ प्रणाली कसार यांनी अपहारीत २५ लाख २८ हजार ३१९ रुपयांची रकम उपजिल्हाधिकारी (रोहयो) विभागाच्या शासकीय बँक खात्यात जमा केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. मनरेगा योजनेच्या लाभार्थ्यांच्या वाट्याची अनुदानाची लाखो रुपयांची रकम स्वत:ला आर्थिक लाभ व्हावा या हेतूने स्वतःच्या बँक खात्यात वळती करण्यात आलेले हे प्रकरण कायदेशीर फौजदारी कारवाईसाठी पोलिसांकडे वळते झाल्यास प्रणाली कसार व त्यांना कुणी-कुणी मदत केली हेही पुढे येण्याची शयता वर्तविली जात आहे.
मनरेगाच्या लाभार्थ्यांच्या वाट्याची शासकीय अनुदानाची २५ लाख २८ हजार ३१९ रुपयांची रकम स्वत:च्या लाभासाठी एपीओ प्रणाली कसार यांच्या नावाने असलेल्या आर्वी येथील देऊरवाडा मार्गावरील स्टेट बँकेत असलेल्या अंबिका टीबीएम सप्लायर नामक बँक खात्यात वळती केली. याच रकमे पैकी काही रकम एपीओ प्रणाली कसार यांनी खर्च केली होती. तर काही रकम संबंधित बँक खात्यात होती, असे आर्वीच्या गटविकास अधिकार्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे.

मनरेगा एपीओ प्रणाली कसार यांनी शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी जिल्हास्तरीय विशेष चौकशी समिती गठीत होणार आहेच. प्रणाली कसार यांनी अपहारीत २५ लाख २८ हजार ३१९ रुपयांची रकम उपजिल्हाधिकारी (रोहयो) विभागाच्या शासकीय बँक खात्यात जमा केली आहे. तर सखोल चौकशीत विविध बाबी पुढे येईलच. सखोल चौकशीअंती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी प्रतिक्रीया मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांनी दिली.

