
वर्धा – जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी अपघातप्रवण स्थळ निर्माण झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यावर भेगा पडल्या असून मार्गावर प्रवाशांसाठी आवश्यक सोई सुविधा दिसून येत नाही.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याची गांभिर्याने दखल घ्यावी. जिल्ह्यात जिथे जिथे कामे अर्धवट आहे, ती तातडीने पुर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील महामार्गांची सुधारणा, दुरुस्ती, वळणमार्ग, अंडरपास, ओव्हब्रिज, अपुर्ण रस्ते अशा विविध बाबींचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी वान्मथी सी, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे, राष्ट्रीय महामार्गाचे अभियंते जिचकार, जगताप, कथळकर, सांसद रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य प्रणय जोशी, तहसिलदार संदीप पुंडेकर, मुख्याधिकारी विजय देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश मोकलकर आदी उपस्थित होते.
सर्वसामान्य नागरिकांना वाहतुकीच्या चांगल्या सुविधा देण्यासाठी रस्ते निर्माण केले जातात. रस्ता वापरासाठी नागरिक पथकर भरतो. महामार्गांवर मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला असतांना रस्त्यावर खड्डे पडलेले दिसतात. महामार्गावर सार्वजनिक प्रसाधनगृह, गावांच्या ठिकाणी प्रवासी निवारा, मार्गालगत वृक्ष लागवड करण्यात आलेली नसल्याने पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच ही कामे तत्काळ करण्याच्या सूचना त्यांनी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

बुटीबोरी-तुळजापूर महामार्गावरुन वर्धा शहरात प्रवेश करणाऱ्या पोहोच मार्गाची रुंदी केवळ चार मीटर होती. आती ती 9 मीटर करण्यात येत आहे. परंतू ही रुंदी देखील पुरेशी नसल्याने 18 मीटर रुंदीचा प्रस्ताव करण्यात यावे. यासाठी भुसंपाद करणे आवश्यक असल्यास करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
काही ठिकाणी महामार्गाच्या अंडपासमध्ये पाणी साचते. अशा ठिकाणी तत्काळ उपाययोजना करण्यात यावी. पवनार गावातील नागरिकांना महामार्ग पार करतांना येणाऱ्या अडचणी व अपघाताची शक्यता पाहता तेथे पादचारी पुलाचे काम करण्यात यावे. वर्धा-हिंगणघाट, वर्धा -आर्वी महामार्ग, आष्टी महामार्गावरील तळेगाव- गोणापूर महामार्ग, कापसी -सिरसगाव महामार्ग, सालोड- पुलगाव या महामार्गावरील दुरुस्तीची कामे तात्काळ हाती घेण्याच्या सूचना यावेळी भोयर यांनी केल्यात.
महामार्ग तपासणी पथकांने वेळोवेळी तपासणी करुन संबंधीत संस्थेकडून देखभाल दुरस्तीची कामे करुन घ्यावी, बजाज चौक येथील उड्डानपूल, पुलगाव शहरातील रेल्वे उड्डानपूल, सिंदी रेल्वे येथील उड्डानपूलाच्या सद्यस्थितीचा आढावा देखील त्यांनी यावेळी घेतला.
जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा आढावा
वर्धा जंक्शन हे मॉडेल रेल्वे स्टेशन म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याअंतर्गत स्टेशनमध्ये करण्यात येणाऱ्या कामांची सद्यस्थिती त्यांनी जाणून घेतली. कामाची गुणवत्ता व प्रवासी सुविधा, अमृत भारत योजनेंतर्गत सेवाग्राम, पुलगाव व हिंगणघाट या स्टेशनच्या करण्यात येत असलेली कामे, याची सविस्तर माहिती व प्रगती त्यांनी जाणून घेतली तसेच सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. कामांची गुणवत्ता व दर्जा योग्य प्रकारे असावा, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या रेल्वेगाड्या पुर्ववत सुरु करणे तसेच रेल्वेचा थांबा पुर्ववत करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची सूचना केली. वर्धा – नागपूर, वर्धा -बल्लारशा रेल्वे मार्गावरील तिसऱ्या व चौथ्या लाईनच्या सद्यास्थितीचा आढावा देखील घेतला. बैठकीला रेल्वे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

