
वाढीव वीजबिल, मीटर रीडिंगचा घोळ आणि आलापल्ली–सिरोंचा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर पदाधिकाऱ्यांची चिंता
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/आलापल्ली : नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) वतीने आलापल्ली येथे रविवार, ३० ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात झालेल्या या बैठकीत स्मार्ट मीटरला विरोध, वाढीव वीजबिले, मीटर रीडिंग न घेण्याचा प्रकार तसेच मागील अनेक वर्षांपासून रखडलेला आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
बैठकीत नागरिकांना स्मार्ट मीटरचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू नये, त्यामुळे स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. जुन्या वीज मीटरचे योग्य पद्धतीने रीडिंग न घेता ग्राहकांना अधिकचे वीजबिल आकारले जात असल्याच्या तक्रारींवरही पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वीजबिलातील अनियमितता दूर करून ग्राहकांना दिलासा मिळावा, यासाठी संबंधित यंत्रणेकडे ठोसपणे पाठपुरावा करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.
यासोबतच आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले बांधकाम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम रखडल्याने नागरिक, वाहनचालक आणि परिसरातील जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने हा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
वीज समस्या, रखडलेली विकासकामे आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी यावर केवळ चर्चा न करता संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करून प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून पुढाकार घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीकांत मद्दीवार, ज्येष्ठ नेत्या पुष्पाताई अलोणे, अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुकाध्यक् नागेश मडावी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इरफान शेख, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे, जिल्हा महासचिव बालाजी गावडे, महिला तालुकाध्यक्षा सारिका गडपल्लीवार, शहराध्यक्षा श्रीशा कुडकावार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अहेरी तालुकाध्यक्ष प्रणाली दुर्गे, आलापल्ली ग्रामपंचायत सदस्य मनोज बल्लूवार, संतोष अर्का, ग्रामपंचायत सदस्या भाग्यश्री बेझलवार, नागेश करमे, माजी ग्रामपंचायत सदस्य सलीम शेख, वासुदेव पेद्दीवार, चंदू बेझलवार, जाफर अली, संदीप ढोलगे, पितांबर कुळमेथे, श्रीनिवास गचार्लावार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

