
चामोर्शी, भेंडाळा, येणापूर व घोट येथे रक्तदानासह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
चामोर्शी, दि. ३१ ऑगस्ट : सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अतुल गण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त चामोर्शी तालुक्यात विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसाचा उत्सव केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

यानिमित्त चामोर्शी येथे रक्तदान शिबिर, विविध ठिकाणी वृक्षारोपण, नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप, मुकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप, ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप, तसेच बसस्थानक परिसरात महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
याशिवाय येणापूर येथे रक्तदान शिबिर, भेंडाळा येथे रक्तदान व फळ वाटप, तर घोट येथे विद्यार्थ्यांना शालेय नोटबुकचे वितरण, फळ वाटप व वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गडचिरोली शहरातही फळवाटप व रक्तदान शिबिर, तसेच अपंग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप व वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
या उपक्रमांमधून गरजू नागरिक, विद्यार्थी व समाजातील विविध घटकांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सामाजिक कार्याला लोकसहभागाची जोड देत हे उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहून या सेवाभावी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन राजू आत्राम यांनी केले आहे.

