
जलपर्णी अन् दुरावस्थेमुळं नागरिक त्रस्त; तलावाच्या तात्काळ दुरुस्ती अन् सौंदर्यीकरणासाठी आमदारांना निवेदन!
नितेश गट्टीवार| गडचिरोली
चामोर्शी | शहराच्या मध्यभागी असलेला ऐतिहासिक गाव तलाव सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून, या तलावात जलपर्णी आणि टाकाऊ वनस्पतींनी अक्षरशः साम्राज्य पसरवले आहे. या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेऊन तलावाची दुरुस्ती, योग्य सुशोभीकरण व सौंदर्यीकरण करावे, अशी आक्रमक मागणी चामोर्शीतील नागरिक व लोकप्रतिनिधींनी संयुक्तपणे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्याकडे केली आहे.

तलावाच्या दुरावस्थेमागील मुख्य मुद्दे:
ऐतिहासिक महत्त्व:
तलाव शहराच्या अगदी मध्यभागी असल्याने गौरी-गणपती विसर्जन आणि देवीचे विसर्जन याच तलावात केले जाते.
दुर्गंधी आणि पाण्याचा तुटवडा:
सध्या संपूर्ण तलावात जलपर्णी वाढल्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली असून पाण्याचा तुटवडाही जाणवत आहे.
नागरिकांसाठी हक्काचे विरंगुळाकेंद्र:
या तलावाचे सौंदर्यीकरण झाल्यास नागरिकांना फिरण्यासाठी आणि विश्रांतीसाठी एक उत्तम व रम्य ठिकाण उपलब्ध होईल.
आमदारांचे तात्काळ आश्वासक पाऊल!
नागरिकांच्या वाढत्या समस्या आणि तलावाच्या दयनीय स्थितीची गंभीर दखल घेत, आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी या कामाला तातडीने मंजुरी मिळवून निधी उपलब्ध करून देत हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. तसेच चामोर्शी शहराच्या विकासासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची विशेष मागणीही यावेळी करण्यात आली.
यांची होती प्रमुख उपस्थिती:
निवेदन सादर करताना भाजप तालुकाध्यक्षा तथा महिला व बालकल्याण सभापती रोशनी वरघंटे, माजी संवर्ग विकास अधिकारी पी. जे. सातार, सोपान नैताम, सुभाष कर्णे, माणिकचंद कोहळे, रमेश नैताम, वासुदेव चिचघरे, रितेश पालारपवार, नीरज रामानुजमवार, बंडु नैताम, भारत धोडरे, कविता किरमे, अनिल बोदलकर यांच्यासह चामोर्शी शहरातील अनेक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

