
आ. रामदास मसराम यांच्या नेतृत्वात शेतकरी, कष्टकरी, आदिवासींसह नागरिकांचा एल्गार
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/वडसा, दि. ३० : आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, आदिवासी, निराधार तसेच महागाईने त्रस्त नागरिकांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी आमदार रामदासजी मसराम यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी वडसा येथे भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चातून शासनाचे लक्ष जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे वेधले जाणार असून, विविध मागण्यांसाठी एकजुटीने आवाज बुलंद केला जाणार आहे.

महामोर्चाची सुरुवात आमदार रामदास मसराम यांच्या कार्यालयापासून होऊन तो उपविभागीय अधिकारी कार्यालय, वडसा येथे पोहोचणार आहे. सकाळी १२ वाजता हा महामोर्चा काढण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या धान बोनस व कर्जमाफीच्या मागणीसह कृषी निविष्ठांच्या वाढत्या किंमती, वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान या प्रश्नांवरही सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे. याशिवाय स्मार्ट मीटरचा प्रश्न, OBC जनगणना, शिक्षक भरती, श्रावणबाळ व निराधार योजनांतील प्रश्न, विद्यार्थ्यांच्या समस्या आणि वाढती महागाई या विषयांवरही महामोर्चातून आक्रमक भूमिका मांडली जाणार आहे.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, शासनाने प्रलंबित मागण्यांची तातडीने दखल घ्यावी आणि जनतेला दिलासा मिळावा, या प्रमुख उद्देशाने हा महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
“हक्कासाठी लढूया, अन्यायाविरुद्ध उभे राहूया!” असा निर्धार व्यक्त करत आरमोरी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महामोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

